चारा छावणी सुरू करावी
By admin | Published: September 6, 2015 10:25 PM2015-09-06T22:25:26+5:302015-09-06T22:27:01+5:30
नारायणगाव : हवालदिल शेतकऱ्यांचे प्रशासनाला साकडे
मनमाड : नांदगाव तालुक्यात माळेगाव, नारायणगाव, घाडगेवाडी, वंजारवाडी, अनकवाडे, कऱ्ही, एकवई या गावांमध्ये गावठी गायी, म्हशींची संख्या मोठ्या प्रमाणात असून, शेतकरीवर्गाने दुबार पेरणी करूनही मका, बाजरीची पिके आली नसल्याने परिसरात चाराटंचाई निर्माण झाली आहे. पशुधन वाचवण्यासाठी नारायणगाव येथे चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी मनमाड बाजार समितीचे माजी उपसभापती देवीदास उगले यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना गहू, तांदूळ असे धान्य मिळाले पाहिजे. मरेगाअंतर्गत शेततळे, माती बांध, विहिरी, नवीन खोदकाम अशा स्वरूपाची कामे त्वरित हाती घ्यावी. नदी, नाल्यांवर मातीनाला बांध, सीमेंट बंधारे अशी कामे सुरू केल्यास मजुरांना कामे मिळतील व त्यांची उपासमार होणार नाही. जलशिवार योजनेअंतर्गत डोंगराळ भागामध्ये समतल चारी व पूर्वीचे तुटलेले माती बंधारे, नाला बांध अशी कामे सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (वार्ताहर)
गेल्या ५० वर्षांत नव्हता असा दुष्काळ यावर्षी जाणवत आहे. पशुधन वाचले नाही तर शेतकरी जगणार कसा याची नोंद घ्यावी. वनविभागाने वन्यजीवांसाठी नारायणगाव, माळेगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे बांधावे व त्यांचे रक्षण करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.