चारा-पाणीटंचाईने शेतकरी हतबल
By admin | Published: June 17, 2016 12:03 AM2016-06-17T00:03:46+5:302016-06-17T00:16:29+5:30
दुष्काळाची परंपरा : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात टॅँकरच्या फेऱ्या
ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण चारा, पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा टँकर तरी दररोज दोन वेळा द्या, अशी मागणी राजापूर, ममदापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
परिसरात गेली तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती असून, एकही मोठे धरण नाही किंवा पाणीपुरवठा योजनाही भागात नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राजापूर येथील लोकसंख्या नऊ हजारांच्या वरती असून, येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आणि तोही दररोज येत नाही तसेच ममदापूर येथील सहा हजारांच्या जवळपास लोकसंख्या असून, याठिकाणी दोन-तीन दिवसांनंतर टँकर येतो तसेच वाडीवस्त्यांवर आठ ते दहा दिवसात एकाच वेळी पिण्याच्या पाण्याचा टँकर येत आहे. त्यामुळे पाणी माणसाला ठेवावे की जनावरांना पाजावे, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. सध्या सगळ्या विहिरी, बोअरवेल कोरडे पडले आहेत.
जनावरांसह माणसांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. ममदापूर येथे पाणीपुरवठा करणारे टँकर आठ-दहा दिवस वाडीवस्त्यांवर येत नाही आणि आले तर दोन टाक्यांच्या वर पाणी मिळत नाही मग ते पुरणार तरी कसे, असा प्रश्न पडला आहे. तशाच प्रकारे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला असून, चारा संपला आहे. निफाड तालुक्यातील उसावर जगलेल्या जनावरांना उपासमारीची वेळ आली आहे. कारण सुरुवातीला दोन हजार रुपये टन असलेला ऊस आज चार हजार रु पये टन झाला आहे. पाऊस लांबल्याने उसाचे भाव गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे शेतकरी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून, उसनवारी हे सगळे प्रकार करून पैसा संपल्याने शेतकरी हतबल झाला आहेत. त्यामुळे आता तरी शासनाने जनावरांच्या चाऱ्याचा व पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी होत आहे.
या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसाच इतके दिवस घरच्या शेतातील काही शेजारच्या जिल्ह्यातील मिळेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून चारा घेऊन तो आत्तापर्यंत कसाबसा पुरला; परंतु सध्या चाऱ्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की एक दोन वैरण कशीबशी टाकून अर्धपोटी जनावरे शेतकरी सांभाळत आहेत. (वार्ताहर)