उष्माघाताने गाय बेशुद्ध
By Admin | Published: April 6, 2017 02:19 AM2017-04-06T02:19:04+5:302017-04-06T02:19:18+5:30
नाशिक : गंगाघाटावरील श्री एकमुखी दत्तमंदिरासमोर कडाक्याच्या उन्हामुळे गाय बेशुद्ध झाल्याची घटना मंगळवार (दि. ४) रोजी घडली.
नाशिक : गंगाघाटावरील श्री एकमुखी दत्तमंदिरासमोर भर दुपारी १२ वाजेच्या सुमारास कडाक्याच्या उन्हामुळे गाय बेशुद्ध झाल्याची घटना मंगळवार (दि. ४) रोजी घडली. भर रस्त्यात गाय बेशुद्ध पडल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली. मात्र, गायीच्या मदतीला कुणीही पुढे येईना. सदर बाब काही जागरूक नागरिकांनी कृषी सेवा केंद्राला कळविली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या कार्यकर्त्यांनी गायीवर प्राथमिक उपचार केले.
पंचवटीतील कृषी गोसेवा केंद्रातील रुपाली जोशी, पुरुषोत्तम राठोड, पायल देसाई, विकी परदेशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गोमातेवर उपचार सुरू केले. रामनवमीची सार्वजनिक सुटी असल्याने ऐनवेळी पशुवैद्यकही मिळेना. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली. एव्हाना गोमाता गाभण असल्याची बाब गोसेवा कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. डॉ. किरण आथरे यांना याबाबत कळविल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गायीवर तातडीने उपचार सुरू केले. ऊन आणि गाभण असल्याने गाय बेशुद्ध झाल्याचा त्यांनी प्राथमिक अंदाज काढला. वेळेत उपचार मिळाल्यामुळे गायीचे प्राण वाचले असे गोसेवा ट्रस्टच्या रुपाली जोशी यांनी सांगितले.