कांबळी अन् भोसलेंकडूनही ‘कालिदास’बाबत पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:49 AM2019-08-28T00:49:01+5:302019-08-28T00:49:28+5:30
राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि राज्य चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीदेखील कालिदास कलामंदिरासंदर्भात नाशिक महापालिकेच्या महापौर आणि मनपा आयुक्तांची भेट घेऊन रंगकर्मींची बाजू मांडली. नियमावलीतील किरकोळ दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
नाशिक : राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि राज्य चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीदेखील कालिदास कलामंदिरासंदर्भात नाशिक महापालिकेच्या महापौर आणि मनपा आयुक्तांची भेट घेऊन रंगकर्मींची बाजू मांडली. नियमावलीतील किरकोळ दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
कालिदास कलामंदिराबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तमालिकेची दखल घेत नाट्य परिषद आणि चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी असलेल्या राज्यस्तरावरील नेतृत्वानेदेखील महापौर रंजना भानसी आणि नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पंचवटीत सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात महापौर भानसी यांची भेट घेऊन नाट्यकर्मींच्या समस्या आणि मागणीबाबत महापौरांना सविस्तर माहिती दिली. तसेच या सर्व समस्यांबाबत एक स्वतंत्र समिती बनवून त्यांच्यामार्फत अहवाल घेऊन त्यातील सूचनांची दखल घेण्याची विनंती केली. त्यावर महापौरांनी येत्या महासभेत त्यावर चर्चा करून आवश्यक ते फेरबदल करीत महासभेची मंजुरी मिळवण्याबाबत आश्वासित केले.
मनपाआयुक्त गमे यांची चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी महापालिकेत भेट घेऊन कालिदासच्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. सर्व रंगकर्मींशी तसेच हौशी आणि व्यावसायिक नाट्यकर्मींशी संवाद साधून ताळमेळ साधत सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करण्याची विनंती केली. त्यावर आयुक्तांनीदेखील सुधारित नियमावलीचा फेरअभ्यास करून त्यात आवश्यक त्या बदलांबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले.