६२ लाख जनतेची अन्न -औषधसुरक्षा अवघ्या ३५ कर्मचाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:18+5:302021-01-21T04:14:18+5:30
नाशिक : कोरोना काळात बहुतांश नागरिकांनी बंद केलेले बाहेरचे अन्नपदार्थ खाणे आता हळूहळू सुरू केले आहे. तसेच हायजीनच्या नावाखाली ...
नाशिक : कोरोना काळात बहुतांश नागरिकांनी बंद केलेले बाहेरचे अन्नपदार्थ खाणे आता हळूहळू सुरू केले आहे. तसेच हायजीनच्या नावाखाली आरोग्यविषयक वस्तूंमध्ये होत असलेली विक्रीतील वाढ भविष्यातही कायम राहण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत अन्न आणि औषधासंबंधित सर्व बाबींवर देखरेख ठेवणारी यंत्रणा इतकी अपुरी आहे की त्यांच्याकडून प्रत्येक भेसळ, अनियमितता, गुणवत्ता तपासणी यांची सातत्यपूर्ण चाचणी घेऊन दोषींवर कारवाईची अपेक्षा बाळगणेच अव्यवहार्य ठरते.
नाशिक जिल्ह्यातील ६२ लाखाहून अधिक नागरिकांची अन्न आणि औषध संबंधित सुरक्षा या दोन्ही विभागातील मिळून अवघ्या ३५ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. अशा परिस्थितीत संबंधित यंत्रणा कितपत न्याय मिळवून देता येईल, हा यक्षप्रश्न आहे. कोरोनाच्या लसीचे आगमन झाले असले तरी त्यामुळे सर्व काही आलबेल झाल्याच्या भ्रमात राहण्यात अजिबात अर्थ नाही. लोकसंख्या दिवसागणिक वाढत चालली असताना त्या प्रमाणात औषध दुकाने आणि उपाहारगृहांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दुसरीकडे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विकले जातात. ते पदार्थ खाण्यायोग्य आहेत की नाही यासाठी त्या पदार्थांतील भेसळयुक्त पदार्थ, दूषित पाण्याने अनेकांना त्रास होतात. भेसळयुक्त मावा आणि पनीरचे कारखाने, अस्वच्छ परिसरात तयार होणारी मिठाई, बुरशीजन्य व खराब झालेल्या मिठाईचा पुनर्वापर अशा अनेक घटना यापूर्वीदेखील समोर आल्या आहेत. अन्न औषध प्रशासनाने पदार्थांची निर्मिती व विक्री करणाऱ्या ठिकाणांची तपासणी करणे आवश्यक असते. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
इन्फो---
सर्व औषध दुकानांची तपासणी अवघड
जिल्ह्यात ५८२८ औषध दुकाने आहेत. मात्र, त्यांची तपासणी करण्यासाठी अवघे ९ औषध निरीक्षक आहेत. एकूण १८ पदे शासनाकडून मंजूर असताना ९ पदे अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे निम्मे संख्याबळ असताना जिल्ह्यासाठी ते कितपत पुरेसे ठरणार अशी परिस्थिती आहे.
इन्फो---
अन्न सुरक्षा तपासणी अशक्य
जिल्ह्यात सध्या ०७ अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांच्याकडे जिल्ह्यातील अधिकृत आणि अनधिकृत मिळून १७ हजारांहून अधिक लहान, मोठ्या, अधिकृत हॉटेल्स, अनधिकृत गाडी विक्रेत्यांची तपासणी केवळ अशक्य बाब ठरते. जिथे घटना घडल्याची माहिती मिळते, तिथेच केवळ कारवाई करणे शक्य होते.
जिल्ह्यातील मेडिकल्स -५८२८
जिल्ह्यातील हॉटेल्स - ७५३६
अन्न सुरक्षा अधिकारी - ०७
औषध निरीक्षक -०९
रिक्तपदांची भरती अत्यावश्यक
जिल्ह्यात गत दोन दशकात लोकसंख्या तसेच अन्न- औषध आस्थापनांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील ६७ पैकी निम्मी पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्याची आवश्यकता आहे.
चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त, अन्न-औषध विभाग
-----------------------------