पक्ष्यांची तहान-भूक भागवण्यासाठी मंदिर परिसरात अन्न-पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 06:34 PM2021-04-18T18:34:14+5:302021-04-18T18:36:42+5:30
कवडदरा : सध्या कडक उन्हाळ्यास सुरुवात झाली असून, इगतपुरी तालुक्यातील साकूर परीसरातील घोटी- सिन्नर हायवे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पक्षीप्रेमींनी पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी व अन्नाची सोय केली आहे. उन्हाळ्यात निसर्गाशी नाते असलेल्या छोट्या पक्ष्यांचा किलबिलाट अंगणात सदैव राहावा, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी अनेक पक्षीप्रेमी, तरुण उत्साही आहेत. बहुतांश पक्षीप्रेमींनी आपल्या घराजवळ पाणी व अन्नाची सोय केली आहे. तर काहींनी पक्ष्यांच्या निवाऱ्यासाठी प्रयत्न केलेले दिसत आहेत. त्यामुळे या भागात पक्ष्यांची तहान-भूक भागवणारे हात वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पाहावयास मिळत आहे.

साकूर परीसरातील सिन्नर घोटी रस्त्यावरील बेलूफाटा परीसरातील श्री साई मंदिर परिसरात देवस्थानने पक्ष्यांसाठी मंदिराच्या आवारात खाद्य व पाण्याची सोय करून एक आदर्शवत उपक्रम राबविला आहे.
गतवर्षी अनेकांनी टाकऊ प्लॅस्टिकचे कॅन, बाटल्या कापून त्यात पाणी व दाणे भरून ठेवले होते. पण, प्लॅस्टिक पाहून पक्षी बिचकत असल्याचे निदर्शनास आल्याने यंदा अनेकांनी मातीच्या भांड्यात अन्न-पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे कधी काळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारी घराघरांतील सकाळ आता पुन्हा एकदा अनुभवयास मिळत असल्याचे अनेकजण बोलून दाखवत आहेत.
सध्या, उष्णतेच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांची परिस्थिती अवघड बनलेली आहे. त्यांना अशा परिस्थितीत पाणी उपलब्ध करून देणे आपले दायित्व आहे. पक्ष्यांची अन्न-पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे मत शेतकरी, पक्षीप्रेमी संतोष झनकर यांनी व्यक्त केले.