सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थांना बंदी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 07:24 PM2018-01-18T19:24:14+5:302018-01-18T19:27:51+5:30
राज्य ग्राहक कल्याण समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या उपहारगृह चालकाने त्याच्याकडील ग्राहकांना बाहेरील खाद्य पदार्थ हॉटेलात खाण्यास मज्जाव करणे समजण्यासारखे आहे, कारण खाद्यपदार्थ विक्रीचा त्याचा व्यवसाय आहे व त्यासाठी परवानाही देण्यात आलेला आहे. परंतु सिनेमागृह चालकाचा आणि खाद्यपदार्थाचा काही एक संबंध नाही
नाशिक : सिनेमागृहात बाहेरील खाद्य पदार्थ नेण्यावर बंदी नाहीच, परंतु ग्राहकांना कायद्याचे ज्ञान नसल्याने व अशी बंदी लादणा-यांना कोणी जाब विचारीत नसल्यामुळे फावते. त्यामुळे सिनेमागृहाचे काम सिनेमा दाखविण्याचे असून, खाद्यपदार्थ बंदी घालण्याचे नाही अशा शब्दात राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी यापुढे जिल्हा पुरवठा विभागाकडे ग्राहकांनी आपल्या तक्रारी कराव्यात असे आवााहनही त्यांनी केले आहे.
राज्य ग्राहक कल्याण समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या उपहारगृह चालकाने त्याच्याकडील ग्राहकांना बाहेरील खाद्य पदार्थ हॉटेलात खाण्यास मज्जाव करणे समजण्यासारखे आहे, कारण खाद्यपदार्थ विक्रीचा त्याचा व्यवसाय आहे व त्यासाठी परवानाही देण्यात आलेला आहे. परंतु सिनेमागृह चालकाचा आणि खाद्यपदार्थाचा काही एक संबंध नाही. बाहेरील पाणी व खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी घालून त्यांच्याकडील महागडी वस्तु ग्राहकाच्या माथी मारण्याचाच हा प्रकार असून, यापुढे अशी सक्ती करणा-यांकडे या संदर्भातील परवानग्या आहेत काय याची विचारणा करा असा सल्लाही अरूण देशपांडे यांनी दिला. ग्राहकांचे अधिकार प्रामुख्याने खाद्यपदार्थाच्या सुरक्षिततेबाबत अधिक आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थाबाबत काहीही तक्रार असेल तर ग्राहकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर करावी ७२ तासात अधिकारी त्याची दखल घेऊन निराकरण करतील असेही सांगितले. ग्राहकांना कोणतीही अडचण आल्यास त्यासाठी थेट न्यायालयात धाव घेण्याची गरज नाही. त्यासाठी शासकीय यंत्रणेची मदत घ्यावी. ग्राहकहिताच्या तक्रारींसाठी जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे यापुढे ग्राहकांनी लिखीत स्वरूपात तक्रार करावी. संबंधित खात्याच्या अधिका-यांकडे तक्रारी पाठवून त्याचे निराकरण करण्यात येईल तसेच तालुका पातळीवरील तक्रारीसाठी पुरवठा खात्याच्या नायब तहसिलदारांकडे तक्रारी करता येतील असेही त्यांनी सागिंतले. ग्राहकहितासाठी डिसेंबर महिन्यात राज्यातील ३१० तालुक्यात चारशेहून अधिक ग्राहक जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले असून, ग्राहक जागा झाल्यास त्याची फसवणूक होण्याची शक्यताच नसल्याचेही शेवटी अरूण देशपांडे यांनी सांगितले.