नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट पुन्हा मुंबईत जाऊन शक्ती प्रदर्शन करणार
By संजय पाठक | Published: March 27, 2024 02:16 PM2024-03-27T14:16:43+5:302024-03-27T14:18:15+5:30
-दुपारी साडेतीनला मुंबईकडे रवाना होणार.
संजय पाठक, नाशिक- लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे तेथील दावेदार विजय करंजकर नाराज असतानाच आता नाशिकची जागा महायुतीच्या माध्यमातून मिळावी यासाठी शिंदे गटाने ही कंबर कसली आहे. नाशिकची जागा कुठल्या परिस्थितीत सोडायचे नाही असा निर्धार नुकत्याच पार पडलेल्या शिंदे गटाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात भेटून पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दुपारी साडेतीन वाजता सर्व पदाधिकारी खासदार हेमंत गोडसे आणि त्यांचे समर्थक रवाना होणार आहेत.
नाशिकची जागा सध्या शिंदे गटाकडे असून हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत मात्र असे असले तरी महायुती मध्ये सध्या भाजपाने ही जागा मागितली आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले असून ही जागा राष्ट्रवादी लढणार असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन दिवसांपासून छगन भुजबळ किंवा भुजबळ कुटुंबातील कोणीही एक जण ही निवडणूक लढवेल अशा चर्चा सुरू आहेत त्यातच आज सकाळी ठाकरे गटाच्या वतीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषित केली.
त्यामुळे आता महायुतीतील जागा कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून आहे. त्यामुळेच शिंदे गटाने ही जागा मिळावी यासाठी मुंबईत धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री दुपारी मुंबईत पोहोचणार असून त्यांच्यासमोर जाऊन नाशिकची जागा मिळवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला अशी माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.