नाशिकच्या उमेदवारीचा उद्या फैसला, दीपक केसरकर यांच्याकडून संकेत
By संजय पाठक | Published: April 17, 2024 04:33 PM2024-04-17T16:33:53+5:302024-04-17T16:35:13+5:30
लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे.
संजय पाठक, नाशिक: लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र, (उद्या) गुरुवारी या संदर्भात पत्रकार परिषद होणार असून त्यात निर्णय जाहीर होणार असल्याचे संकेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.
नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवासाठी दीपक केसरकर आले होते यावेळी बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत नाशिकच्या जागेसाठी सध्या भाजपा, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांमध्ये रस्सीखेच सुरू आहे त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांची नावे चर्चेत आहेत.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महिना उलटूनही महायुतीचा नाशिक मध्ये उमेदवार नसल्यामुळे नाशिकच्या जागेबाबत स्पर्धा कायम असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या संदर्भात दीपक केसरकर यांनी सांगितले की, आज श्री रामाचे दर्शन घेतल्यामुळे धनुष्यबाण शिंदे सेनेकडेच राहील. नाशिकच्या जागे संदर्भात उद्यापर्यंत थांबावं लागेल उद्याला महायुतीची पत्रकार परिषद आहे त्यामुळे सर्व स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.