आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:30 AM2018-10-13T01:30:36+5:302018-10-13T01:30:57+5:30
आपत्ती कधी व कोणती येईल याचा काहीच नेम नाही, शिवाय येणाऱ्या आपत्तीला रोखणेही शक्य नसून, फक्त संभाव्य आपत्तीतून जीवित व वित्तहानीचा बचाव कसा करता येईल एवढेच प्रत्येकाच्या हाती असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची सक्ती शासनाने केली आहे.
नाशिक : आपत्ती कधी व कोणती येईल याचा काहीच नेम नाही, शिवाय येणाऱ्या आपत्तीला रोखणेही शक्य नसून, फक्त संभाव्य आपत्तीतून जीवित व वित्तहानीचा बचाव कसा करता येईल एवढेच प्रत्येकाच्या हाती असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची सक्ती शासनाने केली आहे. विशेष करून शाळा, महाविद्यालयांना याबाबत अधिक जागरूक राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आपत्ती निवारण सप्ताहाच्या निमित्ताने शासनाने समाजातील सर्व घटकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृत करण्याचे काम हाती घेतले आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात प्रामुख्याने स्वत:च्या कार्यालयाची सुरक्षितता ध्यानात घेण्याचे व त्याचबरोबर अन्य शासकीय यंत्रणांच्या संपर्कात राहण्याच्या साधनांचा विचार करण्यास प्राधान्य देण्याची अपेक्षा बाळगली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामी येणाºया सर्व शासकीय खात्यांशी संवाद तसेच पूर्वतयारीच्या दृष्टीनेही विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बहुमजली शाळा, महाविद्यालयांमध्ये आपत्तीला तोंड देणारी यंत्रणा उभी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग, संवाद प्रस्थापित करणारी यंत्रे, इमारत बांधकामाचे स्ट्रक्चर आॅडिट, आग, भूकंपरोधक यंत्रणा आवश्यक करण्यात आली आहे.