हमीभावासाठी सेना लढा उभारणार
By admin | Published: June 26, 2017 12:24 AM2017-06-26T00:24:59+5:302017-06-26T00:25:14+5:30
निफाड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे मराठवाडा आणि विदर्भाला मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्यासाठी मदत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे मराठवाडा आणि विदर्भाला मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्यासाठी मदत होणार आहे. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना शिवसेना वाऱ्यावर सोडणार नाही. याप्रश्नी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यापुढे शिवसेना हमीभावासाठीही लढा उभारणार आहे. सेनेच्या आंदोलनामुळे सरकारला अखेर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, कर्जमाफीसाठीच्या आंदोलनाची ठिणगी पुणतांबा, नाशिक, नगर येथून पेटली होती हे मला माहीत आहे. राज्यात कर्जमाफी निर्णयाचा फायदा झाला नाही, तिथे योग्य निर्णय घेण्यासाठी सेनेचा आग्रह असेल किंबहुना तो निर्णय सरकारला घ्यावाच लागेल. राज्यात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी व एक मोठा वर्ग शांत करण्यासाठी ही कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
निफाड येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी दुपारी साडेबारा वाजता येथील बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी संवाद सभेचे आयोजन केले होते. शेतकरी सभागृहात बहुसंख्येने उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे मार्केट यार्ड सभागृहात न येता मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर अल्प काळ संवाद साधतील, अशी सूचना आल्यानंतर सर्व शेतकरी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर गेले. उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा थांबला. ठाकरे गाडीतून खाली उतरल्यानंतर जिप सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेनेचे शरद कुटे यांनी ठाकरे यांच्याशी कर्जमाफीबद्दल संवाद साधला. निफाडच्या शेतकऱ्यांना सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीचा फक्त सात टक्के शेतकऱ्यांनाच फायदा झाला आहे. यामुळे निफाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झालेला नाही. शासनाचा हा निर्णय व सेनेची भूमिका आम्हाला मान्य नसल्याचेही कुटे यांनी, तर निफाडच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नसून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर या घोषणेमुळे अन्याय झाल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी येथे चर्चा संपवून ठाकरे नैताळ्याकडे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी जाणार होते, तोच उपस्थित शेतकऱ्यांनी ठाकरे यांना साहेब जिथे संवाद सभा आयोजित केली आहे त्या बाजार समितीच्या सभागृहात या व शेतकऱ्यांशी बोला, अशी विनंती केली. त्यानंतर ठाकरे तत्काळ वाहनात बसले व वाहनांचा ताफा सभागृहाकडे रवाना झाला. सभागृहात शिरताच शेतकऱ्यांसमोर आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या समवेत परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, ग्रामविकासमंत्री दादा भुसे, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, लासलगाव कृउबाचे सभापती जयदत्त होळकर, जिप सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह सेनेचे नेते उपस्थित होते.