युरियासोबत रासायनिक खतांच्या ‘लिंकिंग’ची सक्ती; मतभेदाचे आले पीक
By संदीप भालेराव | Published: July 26, 2023 01:59 PM2023-07-26T13:59:23+5:302023-07-26T13:59:45+5:30
शेतकरी, कृषी सेवा केंद्र संचालकांमध्ये मतभेद
नाशिक : कृषी सेवा केंद्रांना खते कंपनीकडून युरियासोबतच रासायनिक खते लिंकिंग करून दिली जात असल्याने दुकानदारांना ते शेतकऱ्यांना विक्री करावे लागत आहे. यातून शेतकरी आणि दुकानदारांमध्ये मतभेदाचे पीक आले असताना कृषी विभागाकडून मात्र याबाबत कोणतीही मध्यस्थी केली जात नसल्याने युरियासोबत रासायनिक खतांचे लिंकिंग देण्याची अनिष्ट प्रथा रूढ होताना दिसत आहे.
शेतीच्या उत्पन्नासाठी पिकांची देखभाल आणि योग्यवेळी खत व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याने सध्या शेतकऱ्यांकडून युरियाचा वापर सुरू झाला आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांनी कृषी केंद्राकडे युरियाची मागणी केली आहे. युरियाची किंमत कमी असतेच; शिवाय युरिया खतामुळे पिकांची वाढ जोमाने होते. पिकांमध्ये हिरवा रंग निर्माण होतो. संतुलित प्रमाणात दिलेला युरिया योग्य मानला जात असल्याने या दिवसांत युरियाची मागणी वाढत असते. परंतु युरिया घेणाऱ्या शेतकऱ्यांना रासायनिक खते दुकानदारांकडून घेण्याची सक्ती केली जात असल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. दुसरीकडे खत विक्रेते युरियाबरोबर रासायनिक खत, वॉटर सोल्युशन, नॅनो युरिया लिंक करून देत असल्याने तेही विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे कृषी सेवा केंद्र संचालकांचे म्हणणे आहे.
एका युरिया गोणीसोबत एक रासायनिक खताची गोणी कंपनीकडून कृषी सेवा केंद्रांना घेण्याची सक्ती केली जाते. शेतकऱ्यांची मागणी फक्त युरियाला असताना केवळ कंपनीच्या आग्रहामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त रासायनिक खते, वॉटर सोल्युशन विकावे लागत असल्याने कृषी सेवा केंद्र संचालक आणि शेतकऱ्यांमध्ये यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
खते कंपनी रासायनिक खतांची लिंकिंक करूनच माल देत असल्यामुळे व्यवहार सुरू राहण्यासाठी कृषी केंद्राकडून खते आणि सप्लिमेंट घ्यावे लागते. कंपन्यांकडून लिंकिंग माल घेण्याची सक्ती केली जात असते, माल घेतला नाही तर पुढील वेळी माल देण्यास आडकाठी केली जात असल्याने विक्रेत्यांचा नाइलाज झाला असल्याचे म्हणणे आहे.