पशुपक्षांकडून पावसाचे पूर्वसंकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:09 PM2020-06-01T22:09:15+5:302020-06-02T00:53:26+5:30
नाशिक : पावसाळाजवळ आल्याने पशुपक्षांकडून आता निश्चित पाऊस पडणार असे जणू काही पूर्वसंकेतच मिळतात. त्यामुळे शेतकरी राजा त्या दृष्टीने पीकपेरणी तसेच हंगामाची आखणी करतो. आता हवामान खात्याकडून आलेल्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्यात येते.
नाशिक : पावसाळाजवळ आल्याने पशुपक्षांकडून आता निश्चित पाऊस पडणार असे जणू काही पूर्वसंकेतच मिळतात. त्यामुळे शेतकरी राजा त्या दृष्टीने पीकपेरणी तसेच हंगामाची आखणी करतो. आता हवामान खात्याकडून आलेल्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्यात येते. पूर्वी मात्र पशुपक्षांकडून तसेच झाडे झुडूपे यांच्यातील बदल आणि निसर्गातील झालेले बदल यावर शेतकरी भरोसा ठेवत असत आणि विशेष म्हणजे सदर अंदाज खरेदेखील ठरत असत. म्हणून आजही ग्रामीण भागातील जुनेजाणते लोक पशुपक्षांकडून मिळणाऱ्या संकेतावरच विश्वास ठेवतात.
पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले असे हमखास समजावे.
‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत. कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभूळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले, तर त्यावर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे.
पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाºयाच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते.
पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंड्यांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.
पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही वाघीण आणि हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत. पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल याची पूर्वकल्पना त्यांना येत असावी. तसेच बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठ्या प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.
----------------------------
पावसाळ्यापूर्वी वारुळातून येतात उधईचे थवेच्या थवे
साधारणत: जंगलात हमखास झाडे पोखरणाºया वाळवी व उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाट्यÞात बाहेर पडू लागले की पावसाचे आगमन होते.
हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले
जात आहेत. दुर्गम जंगलात आणि आदिवासी भागात मोठ्या संख्येने आढळणाºया गोडंबा-म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.
कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाºयाचे संकेत देतो. बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.