पंचांगकर्त्यांचे भाकीत : मान्सून वेळेत, पण सरासरी गाठणारे पर्जन्यमान

By admin | Published: May 15, 2015 11:38 PM2015-05-15T23:38:39+5:302015-05-15T23:52:01+5:30

जुलै-आॅगस्टमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर

Forecasting predictions: Monsoon in time, but on average, the overflowing rain | पंचांगकर्त्यांचे भाकीत : मान्सून वेळेत, पण सरासरी गाठणारे पर्जन्यमान

पंचांगकर्त्यांचे भाकीत : मान्सून वेळेत, पण सरासरी गाठणारे पर्जन्यमान

Next


 नाशिक : नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर दोन दिवस आधीच ३० मे रोजीच आगमन होणार असल्याचे आणि यंदाही सरासरीपेक्षा कमीच पर्जन्यमान राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला असतानाच पंचांगकर्त्यांनीही मान्सून वेळेत, पण सरासरी गाठणारे पर्जन्यमान राहणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. पंचांगकर्त्यांच्या मते, पहिल्या दोन्ही नक्षत्रात समाधानकारक पाऊस न होता त्याचा सर्वाधिक जोर जुलै-आॅगस्टमध्ये राहण्याची शक्यता असून, उत्तरार्धातील नक्षत्रांमध्ये पाऊसमान मंदावणार असल्याचे म्हटले आहे.
भारतीय हवामान विभागाकडून यंदाच्या मान्सूनचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. यंदा मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन होणार असल्याचे सांगताना यंदा पर्जन्यमान सरासरी गाठू शकणार नसल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याप्रमाणेच पंचांगकर्त्यांनीही वृष्टिविचार आपापल्या पंचांगांमध्ये व्यक्त केले आहेत.
पंचांगकर्त्यांच्या मते, मान्सूनचे आगमन वेळेवर होईल, मात्र १४ जूनच्या रवि-मंगळ युतीमुळे मान्सूनचा जोर मंदावेल. १५ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पावसाळ्याच्या मध्यात सरासरी गाठणारे पर्जन्यमान राहील.दि. ८ जून रोजी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होणार आहे आणि नक्षत्राचे वाहन कोल्हा असून, फक्त गुरु व शुक्र जलनाडीत आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी उष्णतामान कमी-जास्त होऊन पर्जन्यमान कमीच राहणार आहे. त्यामुळे मृग नक्षत्रात खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. २२ जूनला सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. १४ जूनच्या रवि मंगळ पर्जन्य स्तंभक योगाचा प्रभाव १ जुलैच्या गुरु-शुक्र युतीमुळे थोडा कमी होईल. त्यामुळे पर्जन्यमान थोडेफार वाढेल पण समाधानकारक पाऊस होणार नाही. जून महिन्यात समाधानकारक पावसाची नोंद होणार नसल्याचे भाकीत केले असतानाच पंचांगकर्त्यांनी जुलै-आॅगस्टमधील पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा आणि मघा या नक्षत्रांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. विशेषत: दि. ३ ते १६ आॅगस्टदरम्यान आश्लेषा नक्षत्रात दमदार व जोरदार पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. त्यानंतर ३१ आॅगस्ट ते २६ सप्टेंबर या कालावधीत पाऊस खंडित स्वरूपाचा होईल. मात्र, २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या हस्त नक्षत्रात पर्जन्यास अनुकूल स्थिती वर्तविण्यात आली आहे. उत्तरार्धातील पूर्वा, उत्तरा, चित्रा व स्वाती नक्षत्रात मात्र पाऊसमान कमी असल्याचे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे.

इन्फो
पूर्वार्धातच करा पाणीनियोजन
पंचांगकर्ते वर्षभर अगोदरच पर्जन्यविचार मांडत असतात. यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होणार आहे. मे महिन्यात उष्णतामान कमी-जास्त राहणार असल्याची प्रचिती येत आहे. यंदा मान्सून सर्वसाधारण असेल. १५ जुलैनंतर होणारा पाऊस सरासरीपर्यंत घेऊन जाईल. पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा आणि मघा नक्षत्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. उत्तरार्धात मात्र पाऊसमान कमी राहील. त्यामुळे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याने पाण्याचे नियोजन पूर्वार्धातच करणे योग्य राहील.
- मोहनराव दाते, दाते पंचांग, सोलापूर

Web Title: Forecasting predictions: Monsoon in time, but on average, the overflowing rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.