एक विदेशी नागरिक पॉझिटिव्ह निघाल्याने धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:12+5:302020-12-27T04:11:12+5:30
ब्रिटनमध्ये जाऊन आलेल्या एकूण १२१ नागरिकांची यादी राज्य शासनाला दिली असून, त्यातील ९६ नागरिक नाशिक शहरातील आहेत. त्यांचे पत्ते ...
ब्रिटनमध्ये जाऊन आलेल्या एकूण १२१ नागरिकांची यादी राज्य शासनाला दिली असून, त्यातील ९६ नागरिक नाशिक शहरातील आहेत. त्यांचे पत्ते शोधून कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले आहेत. शासनाने गुरुवारी (दि. २४) पाठवलेल्या ४८ रुग्णांच्या यादीतील ३६ जण सापडले आहेत. त्यातील २९ नागरिकांचे शुक्रवारी (दि.२५) स्वॅब घेण्यात आले आहेत. दरम्यान, ही मोहीम शनिवारी देखील सुरू असतानाच स्कॉटलँड येथून १३ तारखेला पंचवटीत आलेल्या एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या नागरिकाची या अगोदरची टेस्ट निगेटिव्ह होती; मात्र त्यानंतर नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांच्या साेसायटीत काही जणांना कोरोना संसर्ग झाला होता. पाठोपाठ त्यांच्या आईला देखील संसर्ग झाला होता. त्यामुळे तेही पॉझिटिव्ह निघाले असावे असा प्रशासनाचा अंदाज आहे. संबंधित रुग्ण आणि त्याची आई हे देाघेही पंचवटीत एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.
संबंधित युवक हा नोकरीनिमित्त स्कॉटलँड येथे गेला तेथून तो परतल्यानंतर तीन दिवसांपूर्वी त्याच्या आईला आणि नंतर त्यालाही त्रास होऊ लागल्याने त्यांनी तपासणी केली होती. गुरुवारी (दि.२४) त्याच्या आईच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर शुक्रवारी या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे कोरोना सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.
इन्फो...
विदेशातून येणाऱ्या नागरिकांना आवाहन
ब्रिटनमधून २५नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये आलेल्या नागरिकांची महापालिकेच्या वतीने तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी स्वत:हून नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.