परप्रांतीयांना घरी परतण्याची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:20 PM2020-05-06T21:20:16+5:302020-05-06T23:52:39+5:30
सिन्नर :कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने स्थलांतरित कामगारांसाठी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सिन्नर (सचिन सांगळे)
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने स्थलांतरित कामगारांसाठी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या ३५ दिवसांपासून पाच परप्रांतीय येथे आश्रयास असून, त्यांना आता घरी परतण्याची आस लागली आहे. शासन पातळीवर त्याकरिता उपाययोजना केल्या जात आहेत.
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे हे गाव नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती व नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठिकाणी दोन चेक पोस्ट व एक निवारागृह मार्च महिन्यात उभारण्यात आले होते. निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पाठारे, तहसीलदार राहुल कोताडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पुढाकाराने नांदूरशिंगोटे येथील संदीप हॉटेलचे मालक संदीप भाबड यांनी मंगल कार्यालयात निवारागृह उपलब्ध करून दिले आहे. २ एप्रिल रोजी पुणे रस्त्याने पायी येणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना येथील निवारागृहात क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. सुरुवातीपासून गुजरात राज्यातील आंनद जिल्ह्यातील पाच मजूर येथे आहे.
या सर्व मजुरांवर लक्ष ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित मजुरांना शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंबरोबरच गॅस व शेगडी तसेच भाजीपाला, साबण, टुथपेस्ट, किराणा आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीमार्फत परिसर निर्जंतुकीकरण करून तसेच पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून सहकार्य केले जात आहे. सरपंच गोपाळ शेळके, पंचायत समिती सभापती शोभा बर्के, संदीप भाबड, संजय पावडे यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभत आहे. सिन्नर येथील युवामित्र संस्था तसेच स्थानिक नागरिक यांनीही जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्याचे मंडळ अधिकारी व्ही. पी. शिरसाट व तलाठी शीतल जाधव यांनी सांगितले. गेल्या पस्तीस दिवसांपासून येथील निवारागृहात असलेल्या पाच परप्रांतीयांना घरी जाण्याची आस लागलेली आहे.
महसूल विभागाच्या तलाठी जाधव यांनी दोन दिवसापासून त्यांचे ई पास फार्म भरण्यात आलेले आहेत. गुजरात येथे त्यांना जाण्यासाठी सर्व नियोजन सुरु आहे.