राठी फार्म हाऊसमधील 'रान' पेटले; चार बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 04:52 PM2021-01-31T16:52:36+5:302021-01-31T16:53:15+5:30
अग्नीशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपुर उपकेंद्रावरील दोन बंबांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले.
नाशिक : येथील राठी फार्म हाऊसच्या परिसरातील ह्यरानह्णमधील वाळलेल्या गवताला रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. परिसरात वारा वेगाने वाहत असल्याने क्षणार्धात ह्यवणवाह्ण भडकला. त्यामुळे फार्महाऊस मालकाने अग्नीशमन दलाला माहिती देत मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच सातपुर, सिडको, नाशिकरोड या उपकेंद्रांवरुन बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशमन दलाला यश आले
सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या राठी फार्म हाऊसच्या परिसरात असलेल्या रानातील गवताला दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला आगीचे स्वरुप कमी होते त्यामुळे फार्महाऊसच्या कर्मचाऱ्यांनी झाडांच्या फांद्याच्या सहाय्याने झोडपणी करत पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली; मात्र गवत वाळलेले आणि परिसरात वेगाने सुटलेला वारा यामुळे आगीने रुद्रावतार धारण केला. आगीचे स्वरुप वाढत असल्याचे लक्षात येताच अखिल राठी यांनी त्वरित अग्नीशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपुर उपकेंद्रावरील दोन बंबांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले. पाण्याचा मारा करत फार्महाऊसमधील मोठ्या मोकळ्या भुखंडावरील वाळलेल्या गवताला लागलेली आग विझविण्यास सुरुवात केली. आग मोठी असल्याने या जवानांच्या मदतीला सिडको व नाशिकरोड उपकेंद्रांवरील प्रत्येक एक बंबासह जवानांची अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली. चार बंबांच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली.
या फार्महाऊसच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रानगवत उंचचउंच वाढलेले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करत ज्वलनशील वस्तु फेकल्यामुळे फार्महाऊसमध्ये वणवा पेटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.