बेकायदेशीर ‘सॉ-मिल’वर वनविभागाचा छापा; आरायंत्र जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 04:19 PM2019-11-16T16:19:26+5:302019-11-16T16:20:02+5:30

मातोरी शिवारात संशयित आरोपी पांडुरंग मुरलीधर चारोस्कर याने त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवाना लाकूड कापण्याची आरागिरणी सुरू केली होती.

Forest Department raids on illegal 'saw-mill'; Seized the device | बेकायदेशीर ‘सॉ-मिल’वर वनविभागाचा छापा; आरायंत्र जप्त

बेकायदेशीर ‘सॉ-मिल’वर वनविभागाचा छापा; आरायंत्र जप्त

Next
ठळक मुद्देसंशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित चारोस्कर हा फरार झाला

नाशिक : मागील काही दिवसांपासून अवैधरित्या मौजे मातोरी शिवारात बेकायदेशीरपणे ‘सॉ-मिल’ सुरू करून तेथे आरायंत्र उभारून वृक्षांच्या लाकडांची कत्तल केली जात होती. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे शनिवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास नाशिक पश्चिम वनविभागाच्या प्रादेशिक पथकाने छापा टाकून आरागिरणी उद्ध्वस्त केली.
याबाबत वनविभागाच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी, मातोरी शिवारात संशयित आरोपी पांडुरंग मुरलीधर चारोस्कर याने त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवाना लाकूड कापण्याची आरागिरणी सुरू केली होती. या आरागिरणीमध्ये मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या, बुंध्यांची कापणी केली जात होती. यासाठी संशयित चारोस्कर याने १६इंची करवत (ब्लेड) असलेले उभे आरायंत्रदेखील उभारले होते. या उभ्या आरायंत्रामार्फत सर्रासपणे लाकडांची कापणी येथे मागील काही महिन्यांपासून केली जात होती. याबाबत वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे त्यांनी सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, शांताराम भदाणे, ओंकार देशपांडे, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, सचिन अहिरराव, उत्तम पाटील, रोहिणी पाटील, वर्षा पाटील यांच्या पथकाने आरागिरणीवर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी संशयित चारोेस्कर हा राहत्या घरी आढळून आला नाही. आजुबाजूला वनकर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता तो बाहेरगावी गेला असल्याचे समजले. पथकाने आरायंत्र, १ इलेक्ट्रिक मोटारसह संपुर्ण सांगाडा असा एकूण ५० ते ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भदाणे करीत आहेत. संशयित चारोस्कर हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Web Title: Forest Department raids on illegal 'saw-mill'; Seized the device

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.