रक्तबंबाळ बिबट्याच्या डरकाळ्या अन् सुटकेचा थरार; वनखात्याचं रेस्क्यू ऑपरेशन

By अझहर शेख | Published: August 23, 2022 05:03 PM2022-08-23T17:03:02+5:302022-08-23T17:04:00+5:30

नाशिकमध्ये वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशनला यश, बिबट्या हा कुंपणातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात भगदाडालगत असलेल्या संरक्षक तारांमध्ये अडकून पडलेला आढळून आला.

Forest department rescues an injured leopard in Nashik | रक्तबंबाळ बिबट्याच्या डरकाळ्या अन् सुटकेचा थरार; वनखात्याचं रेस्क्यू ऑपरेशन

रक्तबंबाळ बिबट्याच्या डरकाळ्या अन् सुटकेचा थरार; वनखात्याचं रेस्क्यू ऑपरेशन

Next

अझहर शेख

नाशिक : भक्ष्याच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या मोहाडी-साकोरे मिग शिवारातील एचएएलच्या जंगलात धावण्याचा प्रयत्नात असताना भींतीच्या भगदाडातून बाहेर पडला अन् संरक्षक तारेच्या कुंपणात अडकला. धारधार तारांचा फास पायांभोवती अडकल्याने बिबट्या स्वत:ची सुटका करु शकत नव्हता. यावेळी त्याने जोरजोराने डरकाळ्या फोडल्याने परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच पुर्व वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेत यशस्वीरित्या बिबट्याला रेस्क्यू केले.

मौजे मोहाडीच्या शिवलगत एचएएलच्या संरक्षक भिंतीच्या भगदाडातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आत शिरलेला बिबट्या तारेच्या कुंपणात अडकून पडल्याची घटना मंगळवारी (दि.२३) घडली. याबाबत शेतकऱ्यांनी वनखात्याला सकाळी सात वाजेच्या सुमारास माहिती कळविली. सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे यांनी त्वरित सुत्रे हलवून दिंडोरीचे वनक्षेत्रपाल, पुजा जोशी, नाशिकचे विवेक भदाणे, चांदवडचे वनक्षेत्रपाल एस.बी. वाघमारे यांना सोबत घेत वनपाल, वनरक्षकांचे पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी इको-एको वन्यजीव संस्थेचे स्वयंसेवकदेखील वनखात्याच्या मदतीला धावले. 

बिबट्या हा कुंपणातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात भगदाडालगत असलेल्या संरक्षक तारांमध्ये अडकून पडलेला आढळून आला. तो पुर्णत: शुद्धीवर असल्याने त्याला सुरक्षितरित्या तारेतून काढणे अशक्य होते. यामुळे पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार वनअधिकाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्याचा निर्णय घेतला. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी त्यास भुलीचे औषधाचा डार्ट मारला. तो बेशुद्ध पडताच तारेच्या विळख्यातून त्याला मुक्त करत सुरक्षितरित्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले. तातडीने त्यास वैद्यकिय उपचारासाठी
चांदवडला हलविण्यात आले. 

चार वर्षांपुर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती
जानोरी, मोहाडी, साकोरे मिग, उमराळे, ननाशी या गावांच्या परिसरात बिबट्यांचा संचार आढळतो. भक्ष्याच्या शोधात बिबटे मळे भागात रात्री भटकंती करत असतात. एचएएलच्या जंगलाचे क्षेत्रही बिबटप्रवण आहे. २०१८साली नोव्हेंबर महिन्यात अशाचप्रकारे एक बिबट्या येथील भींतीच्या भगदाडाला लागून असलेल्या कुंपणात अडकून गंभीर स्वरुपात जखमी होऊन मृत्युमुखी पडला होता. तेव्हाही वनखात्याच्या पथकाने त्यास रेस्क्यू केले; मात्र उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले होते.

साधारणत: ७ ते ८ महिन्यांची बिबट्याची मादी एचएएलच्या संरक्षक भींतीच्या भगदाडातून बाहेर पडताना तारेच्या कुंपणात अडकून पडली. यामुळे तारेच्या सहाय्याने तिच्या शरिरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. तिला बेशुद्ध करुन सुटका करून वैद्यकिय उपचारासाठी हलविण्यात आले. मादीची प्रकृती स्थिर आहे. अवघ्या पंधरा मिनिटांत बिबट्याला वनपथकाने रेस्क्यू केले. -सुजीत नेवसे, सहायक वनसंरक्षक

Web Title: Forest department rescues an injured leopard in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.