वनविभागाची धुरा वनमजुराच्या भरोसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:47 PM2020-05-29T22:47:00+5:302020-05-30T00:02:01+5:30

बागलाण तालुक्यात सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये तीस टक्के उपस्थिती असताना सटाणा वनविभागाच्या कार्यालयात चक्क वनमजूर वगळता एकही अधिकारी, कर्मचारी हजर राहत नसल्याचे बागलाणचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जितेंद्र इंगळे पाटील यांनी स्वत: केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. या स्टिंगमुळे अनेक दांडीबहाद्दर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Forest department's reliance on forest laborers! | वनविभागाची धुरा वनमजुराच्या भरोसे!

सटाणा शहरातील नामपूर रस्त्यावरील वनपरिक्षेत्र कार्यालयात तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दांडीबहाद्दर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाऊण तास स्टिंग आॅपरेशन केले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या आवारात उभे असलेले तहसीलदारांचे वाहन.

Next
ठळक मुद्देसटाण्यात स्टिंग आॅपरेशन : तहसीलदारांच्या भेटीत प्रकार उघड

सटाणा : बागलाण तालुक्यात सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये तीस टक्के उपस्थिती असताना सटाणा वनविभागाच्या कार्यालयात चक्क वनमजूर वगळता एकही अधिकारी, कर्मचारी हजर राहत नसल्याचे बागलाणचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जितेंद्र इंगळे पाटील यांनी स्वत: केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. या स्टिंगमुळे अनेक दांडीबहाद्दर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
बागलाण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वच शासकीय प्रमुख कार्यालयांमध्ये ३० टक्के अधिकारी आणि कर्मचाºयांची उपस्थिती असल्याने शासकीय कामकाज काही प्रमाणात सुरळीत आहे. मात्र काही महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये आजही अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे. त्यातच शासनाच्या काही महत्त्वाच्या योजना राबविण्याच्या दृष्टीने तालुक्याच्या प्रमुख अधिकाºयांनादेखील कागदपत्रांची पूर्तता करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा अनुभव दस्तूरखुद्द तहसीलदार पाटील यांना आला.
तहसीलदार गेल्या पाच दिवसांपासून येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात दूरध्वनी तसेच वैयक्तिक भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कोणीही त्याला प्रतिसाद देत नव्हते. त्यानंतर याबाबत मालेगाव विभागाचे उपविभागीय वन अधिकारी येडलावार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनीदेखील प्रतिसाद दिला नाही.
तहसीलदार इंगळे पाटील यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना घेऊन शहरातील नामपूर रस्त्यावरील सटाणा वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) कार्यालय गाठले. दस्तूरखुद्द तहसीलदारांनी इन कॅमेरा स्टिंग आॅपरेश सुरू केले. या स्टिंगमध्ये फक्त कृष्णा काकुळते हा एकमेव वनमजूर आढळून आला. याबाबत विचारणा केली असता सर्व अधिकारी, कर्मचारी मालेगाव व नाशिक येथून ये-जा करीत असून, गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनमुळे येत नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.
तहसीलदार इंगळे पाटील यांनी केलेल्या स्टिंग आॅपरेशन अहवाल तत्काळ जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार यांनी दुपारी ३.१५ ते ४.३० वाजेपर्यंत चौकशी केली. याचा पंचनामादेखील करण्यात आला असून, मंडळ अधिकारी जी. डी. कुलकर्णी, तलाठी जे. एस. सोनवणे, तलाठी एस. एस. भालेराव, वाहनचालक लक्ष्मण गवारी यांच्या पंच म्हणून सह्या घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी मांढरे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Forest department's reliance on forest laborers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.