वनविभागाला प्रश्न : अपघातात मृत्युमुखी पडलेला प्राणी नेमका कुत्रा आहे की तरस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 05:11 PM2018-09-17T17:11:05+5:302018-09-17T17:12:52+5:30
सोमवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही बाब महामार्गावरून जाणा-या एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकी थांबवून प्राण्याचा मृतदेह महामार्गावरून बाजूला केला तसेच मृत्युमुखी पडलेला प्राणी प्रथमदर्शनी तरस या वन्यजिवासारखा दिसत असल्याने तत्काळ त्याने वनविभागाला घटनेची माहिती दिली.
नाशिक : ओझरपासून काही अंतरावर असलेल्या जऊळके-दिंडोरी शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रविवारी (दि.१७) मध्यरात्रीच्या सुमारास एका मुक्या प्राण्याने जीव गमावला. हा प्राणी कुत्रा व तरस यांच्याशी साम्य दर्शविणारा असल्याने वनविभागाचे अधिक ारी चक्रावले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेला प्राणी नेमका कुत्रा आहे की तरस? असा प्रश्न वनविभागाला पडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महामार्ग ओलांडताना रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत जऊळके दिंडोरी शिवारात एका प्राण्याचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही बाब महामार्गावरून जाणा-या एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकी थांबवून प्राण्याचा मृतदेह महामार्गावरून बाजूला केला तसेच मृत्युमुखी पडलेला प्राणी प्रथमदर्शनी तरस या वन्यजिवासारखा दिसत असल्याने तत्काळ त्याने वनविभागाला घटनेची माहिती दिली. सुमारे दोन तासांनंतर घटनास्थळी दिंडोरी-चांदवड वनपरिक्षेत्रातील कर्मचारी दाखल झाले. त्यांनी मृत झालेल्या प्राण्याचा पंचनामा केला; मात्र हा प्राणी कुत्रा आहे की तरस? असा प्रश्न त्यांच्यापुढेही कायम होता. शवविच्छेदनानंतर पशुवैद्यकीय अधिका-यांचे यावर मत घेऊन अपघातात मरण पावलेला प्राणी नेमका कुठल्या जातीचा आहे यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. घटनास्थळी पोहचलेल्या काही कर्मचा-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर प्रथमदर्शनी मृत्युमुखी पडलेला प्राणी कुत्राच आहे, असा दावा केला. मात्र वरिष्ठ अधिका-यांनी याबाबत साशंकता बाळगत या प्राण्याच्या मृतदेहाचे छायाचित्र बघून तरसाच्यादेखील काही खाणाखुणा दिसत असल्याचे सांगितले. तसेच्या त्याचे कु त्र्याशीदेखील साम्य असल्याचा निष्कर्ष नोंदविला. त्यामुळे अपघातात मरण पावलेला प्राणी नेमका कुठला याबाबत संध्याकाळपर्यंत साशंकता कायम होती.
धावपट्टी नव्हे महामार्ग
महामार्गावरून भरधाव वेगाने वाहनचालक वाहने दामटवितात. यामुळे अनेकदा वाहनावरील नियंत्रण सुटून पादचा-यांसह मुक्या प्राण्यांना रस्त्यावर जीव गमवावा लागतो. त्यामुळे वाहनचालकांनी महामार्गाला धावपट्टी समजून वाहने चालविणे टाळावे. हायवे जरी असला तरी तो रन-वे नाही, हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कमाल वेगमर्यादेचे महामार्गावर पालन करत सुरक्षितरीत्या वाहतूक करून स्वत:चा व इतरांचाही जीव वाचविण्याचा प्रयत्न करावा. विशेषत: रात्रीच्या वेळी महामार्गावरून प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन महामार्ग पोलीस, वनविभाग, प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.