नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण; कटर हिसकावून काढला पळ
By अझहर शेख | Published: June 5, 2023 06:59 PM2023-06-05T18:59:54+5:302023-06-05T19:00:27+5:30
पेट्रोल कटर घेऊन वृक्षांची कत्तल करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी जंगलात जाताना दोघा वृक्षतोड्यांना गस्तीवरील वनरक्षकाने रोखले.
नाशिक : पेट्रोल कटर घेऊन वृक्षांची कत्तल करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी जंगलात जाताना दोघा वृक्षतोड्यांना गस्तीवरील वनरक्षकाने रोखले. यावेळी दोघांनी वनरक्षकाची दुचाकी ढकलून देत धक्काबुक्की करून कटर जप्तीच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याची घटना उंबरठाण वनपरिक्षेत्रात सोमवारी (दि.५) घडली. याप्रकरणी सुरगाणा पोलिसांनी शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक पुर्व वनविभागातील अतिसंवदेनशील वनपरिक्षेत्रांपैकी एक असलेल्या उंबरठाण वनपरिक्षेत्रातील अवघड क्षेत्र बोरिपाडा येथील चाफावाडी बीटात फिर्यादी वनरक्षक नवनाथ चिंतामण बंगाळ हे नियमितपणे शासकिय गणवेश परिधान करून दुचाकीने गस्त करत होते. सोमवारी त्यांना दोघे स्थानिक इसम हे एका पोत्यात काहीतरी दडवून जंगलाकडे संशयास्पदरित्या जाताना आढळले. त्यांनी कर्तव्यानुसार त्यांना थांबण्याचा इशारा केला; मात्र संशयित कांतीलाल पांडू चौधरी, योगेश कांतीला चाैधरी व नितीन राऊत या तीघांनी जंगलाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. यामुळे बंगाळ यांनीही दुचाकी उभी करून त्यांचा पाठलाग करत पकडले.
यावेळी त्यांच्याकडे पेट्रोलवर चालणारे झाड कापायचे कटर असल्याचे लक्षात आले. यामुळे वृक्षतोडीच्या इराद्याने हे संशयित जंगलात जात असल्याने बंगाळ यांनी त्यांच्यकडील यंत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला; मात्र तीघांनी त्यांना धक्काबुक्की करत जोरदार प्रतिकार करून यंत्र ताब्यात घेऊ दिले नाही आणि शिवीगाळ करत ‘तु पुन्हा जंगलात ये तुझा बेत पाहतो’ अशी धमकी देऊन पळ काढल्याचे बंगाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून सुरगाणा पोलिसांनी तीघा संशयितांसह त्यांच्या अज्ञात साथीदारांवर कलम ३५३,३३२,३४१,५०४,५०६प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक कोळी हे करीत आहेत.