वनरक्षक भरती प्रक्रीया : आमिषावर विश्वास ठेवाल तर आर्थिक फसवणूकीचे बळी व्हाल...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 07:40 PM2019-08-08T19:40:19+5:302019-08-08T20:01:43+5:30
काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे
नाशिक :नाशिक, अहमदनगर वनवृत्तामध्ये ४४ वनरक्षक पदे भरावयाची आहेत. यासाठी नुकतीच १२० गुणांची लेखी परीक्षा आॅनलाइन पध्दतीने घेतली गेली. नाशिक वनृत्तासाठी तब्बल ९ हजार ७९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेत ४५टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना शारिरिक मैदानी चाचणीला आता सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, वनरक्षक भरती प्रक्रिया संपुर्णपणे पारदर्शी राबविली जात आहे. ही संपूर्ण प्रक्रीया गुणवत्तेवर अधारित असून अवैध मार्गाने जे उमेदवार या भरती प्रक्रीयेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन उमेदवारी तत्काळ रद्द केली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी सांगितले. त्यामुळे कु ठल्याही प्रकाररे आमिष, प्रलोभनांवर उमेदवारांनी विश्वास न ठेवता संभाव्य आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या वनविभागाच्या वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रीया राबविली जात आहे. याअंतर्गत नाशिक वनवृत्तात केवळ ४४पदे भरावयाची आहेत. त्यासाठी एकूण ९ हजार ७९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून लेखी परिक्षेत फक्त १७५ परिक्षार्थी उत्तीर्ण होऊ शकले. या उमेदवारांची येत्या मंगळवारी (दि.१३) या उमेदवारांची शारिरिक तपासणी तसेच आवश्यक त्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांनी येत्या २० तारखेला धावण्याच्या स्पर्धेला सामोरे जावे लागलणार आहे. स्थानिक आदिवासी तालुक्यांमधील तरूणांसाठी २६ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवणसारख्या आदिवासी तालुक्यांमधून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे. यासाठी त्यांनाही भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांमधून जावे लागणार आहे.
वनरक्षक भरती प्रक्रीया ही संपुर्णत: पारदर्शी आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राबविली जात आहे. त्यामुळे या भरतीत कुठल्याहीप्रकारे अवैध बाबींना थारा नसल्याचे फुले यांनी स्पष्ट केले आहे. काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे, तसेच गैरमार्गाचा क ोणीही अवलंब करत असल्याचा संशय आल्यास त्याबाबत थेट तक्रार करावी, योग्य तक्रारींची निश्चित स्वरूपात दखल घेतली जाईल, असेही फुले यांनी स्पष्ट केले.