वन अधिकाऱ्याला वाळूचोरांची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:36 AM2018-06-23T00:36:23+5:302018-06-23T00:36:41+5:30
नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा परिसर असलेल्या खानगाव थडी येथे अवैधरीत्या वाळू उपसा करणाºयांनी वन अधिकारी भगवान ढाकरे यांना अरेरावीची भाषा करून धमकी दिली. ढाकरे यांनी संबंधित वाळूतस्करांविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सायखेडा : नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा परिसर असलेल्या खानगाव थडी येथे अवैधरीत्या वाळू उपसा करणाºयांनी वन अधिकारी भगवान ढाकरे यांना अरेरावीची भाषा करून धमकी दिली. ढाकरे यांनी संबंधित वाळूतस्करांविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि. २०) रात्री दीड वाजता वन अधिकारी भगवान ढाकरे, वनपाल पंडित आगळे, वनरक्षक चंद्रमनी तांबे, वनकर्मचारी प्रकाश गांगुर्डे, वाहनचालक रामदास कडाळे, वनकर्मचारी सुनील जाधव हे खानगाव थडी परिसरात गस्त घालत असताना गोदावरी नदीपात्रात वनखात्याच्या हद्दीतून काही लोक ट्रॅक्टरने वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याची खबर मिळाली. नांदूरमधमेश्वरच्या बाजूने जाऊन माहितीची शहानिशा केली असता खानगाव थडीच्या बाजूने एका ट्रॅक्टरमध्ये वाळू भरीत असल्याचे दिसून आले. वाळूतस्करांना वन कर्मचारी येत असल्याची चाहूल लागल्याने त्यांनी वाळू भरलेला ट्रॅक्टर नदीपात्रातून वरती आणून एका वस्तीजवळ आडोशाला उभा केलेला दिसला. याबाबत चौकशी करीत असताना भारत जगताप, रा. खानगाव थडी (ता. निफाड) व दीपक निकम, रा. दिंडोरी तास हे लाल रंगाच्या हिरोहोंडा दुचाकीवरून आमच्या जवळ आले.
शासकीय कामात अडथळा निर्माण करून दुचाकी तेथेच सोडून वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन पळ काढला, तर दीपक निकम हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, असे ढाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सदर मोटारसायकल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, पोलीस अधिक तापस करत आहेत.
अरेरावी सुरू केली
भारत जगताप यास सदर निळ्या रंगाचा ट्रॅक्टर कोणाचा आहे असे विचारले असता तो माझ्या मालकीचा आहे, असे त्याने उत्तर दिले. ट्रॅक्टर खानगाव थडी येथील वन खात्याच्या कार्यालयात घेऊन या असे सांगितले असता त्यांनी अरेरावी केली. तुमचा काय संबंध आहे, तुम्ही मला का त्रास देतात. तुम्हाला बघून घेईल असे बोलून, मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही येथे कसे नोकरी करता अशी धमकी दिली.