‘जीपीएस’द्वारे होणार वनजमिनीचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:12+5:302021-06-03T04:12:12+5:30
नाशिक पश्चिम वनविभागाने ब्रह्मगिरीच्या पायथ्याला सुरू असलेल्या खासगी जागेतील उत्खननाच्या वादामुळे आता वनविभागाकडून या भागातील वनजमिनीचे क्षेत्र आणि सीमांकनाचे ...
नाशिक पश्चिम वनविभागाने ब्रह्मगिरीच्या पायथ्याला सुरू असलेल्या खासगी जागेतील उत्खननाच्या वादामुळे आता वनविभागाकडून या भागातील वनजमिनीचे क्षेत्र आणि सीमांकनाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. वनजमिनीची हद्द शोधून काढण्यासाठी आता ९१ वर्षे जुन्या सातबारा उताऱ्यांची छाननीही वनविभागाने सुरू केली आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाचे कान टोचले. यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले. नाशिक पश्चिम वनविभागाने उत्खननाची जागा वनजमीन आहे किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी आता ९१ वर्षे जुन्या सातबारा उताऱ्यांची छाननी सुरू केली आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाचे कान टोचले. यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी यांची चौकशीचे आदेश देत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तलाठी नवीन परदेशी, कोतवाल शंकर लक्ष्मण वाघेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच मंडल अधिकारी, तहसीलदारांनाही नोटिसा काढण्यात आल्या. तसेच सविस्तर अहवालही प्रांतधिकारी तेजस चव्हाण यांनी मागितला आहे. परवानगी नाकारल्यानंतरही या ठिकाणाहून सुमारे दोन हजार ब्रास गौण खनिजांचे अवैध उत्खनन झाल्याची धक्कादायक बाब पाहणीत उघड झाली आहे. त्यामुळे खासगी विकासकाला १ कोटी ५२ लाख ४० हजार रुपयांच्या दंडाची नोटी बजावण्यात आली आहे.
--इन्फो--
‘बेंचमार्क’शोधणार, बुरूज उभारणार
वनजमिनीच्या संरक्षणासाठी वनविभागात सर्व्हेअर अर्थात वनक्षेत्रपाल दर्जाचा अधिकारी नियुक्त असतो. या अधिकाऱ्यामार्फत वनजमिनीचे सीमांकन, तसेच वनक्षेत्राची मोजणी केली जाते. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मौजे मेटघर व तळेगाव शिवारात झालेल्या उत्खनन वनजमिनीच्या हद्दीत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आता सर्व्हेअरकडून सर्वेक्षण करून घेतले जाणार आहे. दरम्यान, बेंचमार्कचा शोध घेणे, नैसर्गिक खुणांचे अस्तित्व तपासणे आणि वनजमिनीच्या हद्दीवर बुरूजांची उभारणी अशी कामे करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली आहे.