नववसाहतीत मोकळे भूखंड बनले जंगल
By admin | Published: August 30, 2016 01:34 AM2016-08-30T01:34:25+5:302016-08-30T01:38:59+5:30
साफसफाईची मागणी : महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष
पाथर्डी फाटा : परिसरातील वासननगर, प्रशांतनगर, ज्ञानेश्वरनगर भागातील मोकळे भूखंड अस्वच्छतेचे आगर बनले असून, सध्या या भूखंडांवर झाडाझुडपांचे जंगल वाढल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने या भूखंडांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाथर्डी फाटा परिसर हा अलीकडच्या काळात झपाट्याने विकसित होऊन नागरी वस्ती विस्तारलेला मोठा भाग आहे. असे असूनदेखील परिसरात अनेक भूखंड मोकळे पडून आहेत. हे खासगी भूखंड वर्षानुवर्षे मोकळे राहिल्याने येथे झाडाझुडपांचे जंगल वाढलेले पहायला मिळते. शिवाय परिसरातील नागरिक व महिला घरातील कचरा, शिळे अन्न, छाटलेल्या झाडांच्या फांद्या आदि गोष्टी आणून टाकण्यासाठी सर्रासपणे या भूखंडांचा वापर करतात. परिणामी कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
ज्या इमारती किंवा घराशेजारी हे भूखंड आहेत तेथील हिवाशांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागत आहे. तेथे साचलेल्या कचऱ्यांमुळे दुर्गंधी, अस्वच्छता, डास व चिलट्यांचा त्रास शेजारच्या घरांना सहन करावा लागतो. वाढलेली झाडे, झुडपे व गवतामुळे साप, विंचू व इतर किटकांचा धोका नेहमीच जाणवत राहतो. परिणामी आरोग्यासोबत सुरक्षितताही धोक्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या भूखंडांच्या स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची, महापालिकेची की भूखंड मालकांची अशा भ्रमात नागरिक राहताना दिसून येतात. कधी कधी शेजारी राहणारे लोक भूखंड स्वखर्चाने साफ करूनही घेतात. मात्र परिसरातील लोक पुन्हा कचरा टाकून तो अस्वच्छ करत असल्याने बाधितांनी असा खर्च किती वेळा करावा, असा प्रश्न निर्माण होतो. शिवाय कचरा टाकणाऱ्यांना अडवायला गेल्यास बऱ्याच वेळा नाहक वादावादी होण्याचे प्रकार होत असल्याचे अनुभव नागरिकांनी कथन केले आहेत.
सध्या पावसाळी वातावरणामुळे या भूखंडांवर मोठं-मोठी बाभळीची झाडे, काटेरी झुडपे, कमरे इतक्या उंचीचे गवत व वेली वाढल्या असल्याने घरांशेजारी जंगल निर्माण झाल्याची परिस्थिती ठिकठिकाणी दिसून येते. या भूखंडांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने, त्यात कुजणारा कचरा, तेथे विश्रांती घेणारी भटकी कुत्री व मोकाट जनावरे यांचाही त्रास रहिवाशांना होत आहे.