शाळा, कॉलेजात बस पास देण्याचा विसर
By admin | Published: September 11, 2014 10:27 PM2014-09-11T22:27:47+5:302014-09-12T00:10:16+5:30
शाळा, कॉलेजात बस पास देण्याचा विसर
नाशिक : शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना बसचा पास काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी परिवहन महामंडळाने शाळा-महाविद्यालयांत पास केंद्र सुरू करण्यासाठी केलेल्या आवाहनाला अनेक शाळा-महाविद्यालयांनी प्रतिसादच दिला नसल्याचे दिसून आले. बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पास काढण्यासाठी पास केंद्रावर तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हा वेळ घालविताना त्यांंचे शैक्षणिक नुकसान होत असते. सार्वजनिक सुटीच्या दिवशी पास केंद्रालाही सुटी असल्याने विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी कामकाजाच्या दिवशीच यावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची ही धावपळ टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये पास केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत महामंडळानेही पास केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आल्यास परवानगी देण्याची तयारी दाखविली होती. परंतु अनेक शाळा-महाविद्यालयांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट सुरूच असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)