कोरोना काळात गाळाधारकांचे भाडे माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:01 PM2020-06-07T22:01:50+5:302020-06-08T00:28:08+5:30
सिन्नर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने उद्योग, व्यवसाय सर्वच बंद आहे. त्यामुळे नगरपालिका व ...
सिन्नर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने उद्योग, व्यवसाय सर्वच बंद आहे. त्यामुळे नगरपालिका व बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना या काळात भाडे आकारू नये अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे यांना पत्राद्वारे केल्या आहेत.
देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात संचारबंदी व लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम झाले आहेत.
उद्योग व्यवसाय याबरोबर शहरांबरोबर ग्रामीण भागातीलदेखील बाजारपेठेत शुकशुकाट बघावयास मिळाला. अशा प्रकारच्या आर्थिक संकटामुळे छोटे-मोठे व्यवसाय करणारे गाळाधारक अडचणीत सापडले आहेत. या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र सरकारने घरे, दुकाने, गाळे यांचे दोन महिन्यांचे भाडे मालकांनी घेऊ नये, याबाबत आदेश पारित केले होते.
याच पार्श्वभूमीवर सिन्नर येथे नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर करारनामे केलेल्या गाळ्यांचे भाडे व्यावसायिकांकडून घेऊ नये अशा सूचना आमदार कोकाटे यांनी नगरपालिका व बाजार समिती यांना केल्या आहेत.
सध्या गाळेधारकांचे सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद असून, ते आर्थिक अडचणीमध्ये असताना त्याच्यावर कुठलीही कार्यवाही वा सक्ती न करता एप्रिल व मे या दोन महिन्यांचे भाडे घेऊ नये असे या पत्रात म्हटले आहे.