टेलिग्रामवरील ‘टास्क’ला भूलला अन् नऊ लाख गमावून बसला; ऑनलाइन फसवणूकीचा शोधला नवा फंडा
By अझहर शेख | Published: September 2, 2023 05:59 PM2023-09-02T17:59:17+5:302023-09-02T17:59:37+5:30
सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक या सोशलमिडियाला आपले ‘टुल्स’ बनविले आहे.
नाशिक : सुशिक्षित बेरोजगारांना टार्गेट करत आमीष दाखविणे, विविधप्रकारच्या सोशलमिडियावर त्यांना ‘टास्क’ देणे, त्यासाठी मेंबरशिपच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेत सुरूवातीला ‘टास्क’ पुर्ण केले, म्हणून ५००रूपयांपर्यंतची रक्कम बँक खात्यात जमा करून विश्वास संपादन करत लाखोंना गंडा घालण्याचा नवा फंडा सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे.
आडगाव शिवारात राहणाऱ्या एका दुकानदाराला अशाचप्रकारे पार्टटाइम जॉबचे आमीष व्हॉट्सॲप क्रमांकावरून ‘आलिशा’नावाच्या महिलेने दाखविले. यानंतर ‘फायनान्स बिझनेस’ नावाच्या टेलिग्रामवरील ग्रूपमध्ये जॉइन करून घेतले. यानंतर फिर्यादी दिनेश नगराळे (४८) यांना विविध सूचना देत टास्क सोपविले. त्यावर ‘रिवह्यू’ देण्यास सांगून कमेंट सबमिट केल्यानंतर कमिशन स्वरूपात रक्कम त्या ग्रूपवर आभासी स्वरूपात जमा झाल्याचे दर्शवित गेले. वेळोवेळी असे टास्क पुर्ण केल्यानंतर त्यासाठी रक्कम ऑनलाइन उकळली. तसेच भरलेले पैसे परत मिळविण्याकरिता, व्हीआयपी मेंबरशिपकरिता विविध कारणे ऑनलाइन सांगून त्यांच्या बचत खात्यातून संबंधित कंपनीच्या खात्यात ऑनलाइन युपीआयद्वारे भरणा करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नगराळे यांना १२ जानेवारी ते ८ एप्रिल २०२३ या कालावधीत तब्बल ९ लाख १० हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
‘टास्क फ्रॉड, जॉब फ्रॉड’मध्ये वाढ
सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक या सोशलमिडियाला आपले ‘टुल्स’ बनविले आहे. मात्र आता त्यांनी गुन्ह्याची पद्धत बदलविली असून ऑनलाइन जाळ्यात अडकविण्यासाठी ते कुठल्याहीप्रकारची भीती आता दाखवित नाही, तर लॉटरी लागली, ‘टास्क घ्या अन् घरबसल्या रक्कम कमवा’ असे आमीष दाखवू लागले आहेत. नागरिकांनी अशा भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन नाशिक शहर सायबर पोलिसांनी केले आहे.