प्रारूप पूर्वीच प्रभाग रचना होणार स्पष्ट
By admin | Published: October 6, 2016 12:45 AM2016-10-06T00:45:13+5:302016-10-06T00:46:48+5:30
मनपा निवडणूक : आरक्षण सोडतीची प्रशासनाकडून तयारी; सीमा निश्चितीकडे लक्ष
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या सोमवारी (दि.१०) प्रसिद्ध केली जाणार असली तरी शुक्रवारी (दि.७) होणाऱ्या आरक्षण सोडतीच्याच वेळी सीमांकनेही जाहीर केली जाणार असून, प्रभागाची रचना त्याचवेळी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने बुधवारी (दि.५) आयुक्तांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीची रंगीत तालीम पार पाडत सज्जता दाखवून दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रारूप प्रभाग रचना दि. १० आॅक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार असून, त्यावर दि. १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. तत्पूर्वी, शुक्रवारी (दि.७) अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला यासाठी राखीव जागांची सोडत काढण्यात येणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या या सोडतीच्या वेळी सर्व ३१ प्रभागांचे नकाशे व त्यांच्या सीमाही सभागृहाबाहेर फलकावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रभागांची रचना त्याचवेळी ढोबळ स्वरूपात स्पष्ट होणार आहे. मात्र, प्रभागात नेमक्या कोणत्या नगरांचा, भागांचा समावेश असेल याची माहिती दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. शुक्रवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम करण्यात आली. आरक्षण सोडतीच्या वेळी तीन स्क्रीन लावण्यात येणार असून, बाहेरही दोन स्क्रीनची व हजार खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे. आरक्षण सोडतीला हरकतप्रारूप प्रभाग रचनेपूर्वीच होणाऱ्या आरक्षण सोडतीला शिवसेनेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीने हरकत घेतली आहे. याबाबत शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी आयुक्तांची भेट घेऊन आरक्षणाच्या वेळी प्रभागांच्या सीमाही जाहीर करण्याची मागणी केली. प्रभागांची सीमांकने जाहीर झाल्याशिवाय कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडले याचा काहीही उलगडा होणार नसल्याचा दावा या नेत्यांनी केला. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनीही मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी सीमांकने जाहीर केल्याचे स्मरण करून देत यंदाही त्याचीच पुनरावृत्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. परंतु सदरचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अगोदरच आखून दिला असल्याचे सांगत आयुक्तांनी त्याबाबत आयोगाकडेच दाद मागण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, शिवसेनेकडून आयोगाला याबाबत फॅक्स केला जाणार असल्याची माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.