इगतपुरी तालुक्यातील राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:28+5:302021-07-08T04:11:28+5:30
घोटी (पुरुषोत्तम राठोड) : इगतपुरी तालुक्यात आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या वतीने ...
घोटी (पुरुषोत्तम राठोड) : इगतपुरी तालुक्यात आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या वतीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात पाच गट, दहा गण असून, या गटांवर तीन शिवसेना, एक काँग्रेस, एक राष्ट्रवादीची सत्ता आहे. आरक्षण बदलामुळे गट बदलण्याची चिन्हे समोर असताना दुसऱ्या गटातून लढाईच्या तयारीला लागणारे उमेदवार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ओबीसींच्या निर्णयामुळे पुन्हा बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे. अर्थात पुन्हा आपला गट काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या काळात विकास कामे रखडली असल्याने आणि येत्या काळात निवडणुकांचे पडघम वाजणार असल्याने सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींच्या उद्घाटनाचे पेव फुटले आहे. काही लोकप्रतिनिधींना एवढी घाई झाली की, आदिवासी वाड्या-पाड्यांवर वापरावयाचा डोंगरी निधी अतिघाईने की मर्जी राखण्यासाठी वर्ग करण्यात आला. विकासाच्या मुद्यावर कार्य करीत असताना एका गावात वर्ग झालेला निधी, कामाची सुरुवात झाली असताना काही राजकीय हितापोटी त्या ठिकाणचा निधी एका गावातून दुसऱ्या गावात पळविला असल्याची तक्रार शिवसेनेच्या एका गटनेत्याने केली आहे. अशा विविध विषयांना तालुक्यात उधाण आले असून, शासकीय पातळीवर त्याची चौकशी सुरू झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाच्या घोटी गटावर सर्वांचे लक्ष वेधले असून, स्थानिक उमेदवारांच्या विरोधात शह देण्यासाठी विरोधक मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. एकंदरीत सर्व पक्षांतील पदाधिकारी श्रेयाची लढाई लढण्यात व्यस्त असून, विकासाच्या मुद्यावर येऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारांचा कस लागणार आहे.
------------
समस्यांना बगल
इगतपुरी आदिवासी तालुका असून, तालुक्यात सर्वांत जास्त अतिवृष्टीमुळे दरवर्षी रस्त्यांची वाताहत होते.
अतिदुर्गम भागातील रस्ते, गावातील शाळा, नळपाणी योजना, या मूलभूत सुविधांचे निवारण करण्यासाठी ९६ ग्रामपंचायतींचे कार्य पूर्णत्वास नेण्याचे कार्य स्थानिक प्रशासन तथा लोकप्रतिनिधींचे आहे. समस्यांचे निवारण करणे दूरच काही राजकीय मंडळींकडून हित तथा द्वेषाचे राजकारण सुरू झाले असल्याने तालुक्यातील जनतेच्या समस्यांना बगल दिली जात आहे.
--------------
राजकीय पदाधिकाऱ्यांची धडपड
निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतःला सिद्ध करण्यासाठी राजकीय नेते मंडळी रस्त्यावर उतरली आहेत. त्यात तालुक्यात सर्वांत जास्त गाजणारे मुद्दे समोर येत आहेत. घोटीतील काँग्रेस-सेनेतील पाणी प्रश्नाचा श्रेयवाद, राष्ट्रवादीचे ओबीसी आंदोलन, मनसेचा कामगारांच्या प्रश्नावरील लढा, याबरोबरच विकासकामांच्या उद्घाटनाचे पेव अशा या विविध मुद्यांवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करीत आहेत.
(०७ घोटी १)
070721\07nsk_21_07072021_13.jpg
०७ घोटी १