माजी सभागृह नेत्याला डेंग्यू, सातपूरमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:49 PM2017-10-25T23:49:49+5:302017-10-26T00:28:37+5:30
शहरात डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी प्रसार सुरूच आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधील गुरुकुल कॉलनीत महापालिकेचे माजी सभागृह नेता डॉ. सुभाष देवरे यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक : शहरात डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी प्रसार सुरूच आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधील गुरुकुल कॉलनीत महापालिकेचे माजी सभागृह नेता डॉ. सुभाष देवरे यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील स्वच्छता मोहिमेचा यानिमित्ताने फज्जा उडाल्याचे दिसत आहे. आॅक्टोबर महिन्यातच तब्बल सव्वाशे डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, ते सर्व पॉझिटिव्ह आहेत. अशा प्रकारचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिका त्या-त्या परिसरात जाऊन स्वच्छता मोहीम राबवित असली तरी मुळातच नियमित स्वच्छता आणि विशेषत: डास प्रतिबंधक फवारणी होत नसल्याच्या तक्रारी असून, त्यालादेखील यानिमित्ताने पुष्टी मिळत आहे. सिडको प्रभागाचे सभापती सुदाम डेमसे यांच्या कन्येला डेंग्यू झाल्यानंतर आता सातपूर विभागात वनविहार कॉलनीच्या जवळील गुरुकुल कॉलनी परिसरात राहणाºया डॉ. देवरे यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या सहा दिवसांपासून ते एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. परिसरात महापालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी तसेच पाण्याचे साठे तपासावे, बांधकामावरील पाण्याबाबत नोटिसा द्याव्या, अशी मागणी होत आहे.