थकीत कर्जाला बॅँकेचे माजी संचालक जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:17 AM2019-01-04T00:17:13+5:302019-01-04T00:19:37+5:30
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आजी-माजी संचालकांनी जिल्ह्यातील सहकारसम्राटांच्या १२ संस्थांना सढळ हस्ते वाटप केलेले ३४७ कोटींचे कर्ज वसूल होत नसल्याने जिल्हा उपनिबंधकांनी ३८ आजी-माजी संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या नोटिसा बजावून खुलासा मागविल्याने संचालकांची धावपळ उडाली आहे, तर दुसरीकडे कर्जवसुलीसाठी गुरुवारी जिल्हा बॅँकेने निफाड, नासाका कारखान्याच्या संचालक मंडळासह श्रीराम बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांनाही नोटिसा बजावल्या आहेत.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आजी-माजी संचालकांनी जिल्ह्यातील सहकारसम्राटांच्या १२ संस्थांना सढळ हस्ते वाटप केलेले ३४७ कोटींचे कर्ज वसूल होत नसल्याने जिल्हा उपनिबंधकांनी ३८ आजी-माजी संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या नोटिसा बजावून खुलासा मागविल्याने संचालकांची धावपळ उडाली आहे, तर दुसरीकडे कर्जवसुलीसाठी गुरुवारी जिल्हा बॅँकेने निफाड, नासाका कारखान्याच्या संचालक मंडळासह श्रीराम बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांनाही नोटिसा बजावल्या आहेत.
जिल्हा सहकारी बॅँकेने सन २००२ ते २०१३ या अकरा वर्षांच्या काळात केलेल्या कर्जवाटपात ३४७ कोटींची थकबाकी असून, बॅँकेने वसुलीसाठी अनेक उपाय करूनही हे कर्ज वसूल होत नसल्याने बॅँकेच्या एनपीए वाढला. या पार्श्वभूमीवर बॅँकेच्याच माजी संचालकांनी या कर्जवाटपाच्या चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत तत्कालीन लेखापरीक्षक जयेश आहेर यांनी झालेल्या कर्जवाटपाची सखोल चौकशी केली
होती.
या चौकशीचा अहवाल सहकार विभागाला सादर करण्यात आला होता. यात मोठी थकबाकी असणाºया १२ संस्थांना अनियमित कर्जवाटप झाल्याचा निष्कर्ष नोंदवित बॅँकेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
या अहवालाच्या आधारे जिल्हा उपनिबंधकांनी सहकार कायदा कलम ८८ अन्वये कारवाई आरंभली असून, त्यात बॅँकेच्या आजी-माजी ३८ संचालकांसह बॅँकेच्या ८० कर्मचाºयांनाही नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसींवर आपले म्हणणे मांडण्यासाठी संचालकांची धावपळ उडाली आहे.
या संस्थांना वाटप केले कर्ज
जिल्हा बॅँकेच्या तत्कालीन संचालकांनी निफाड व नाशिक सहकारी साखर कारखान्याबरोबरच छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग, हिरे कुटुंबीयांच्या रेणुका देवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, श्रीराम सहकारी बॅँक, दिंडोरी तालुक्यातील ५ आदिवासी विकास कार्यकारी सोसायटी, सिन्नर तालुका बहुद्देशीय सहकारी संस्था, मालेगाव मधील १ वि. का. सोसायटीला कर्ज वाटप केले होते.
अडचणीत आलेले संचालक
सहकार विभागाने कर्ज वाटप प्रकरणात जबाबदारी निश्चित केलेल्यांमध्ये जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने शांताराम तात्या आहेर, माणिकराव बोरस्ते, अनिल आहेर, नानासाहेब सोनवणे, राजेंद्र भोसले, वसंत गिते, चंद्रकांत गोगड, माणिकराव शिंदे, अविनाश अरिंगळे, राजेंद्र डोखळे, शिरीशकुमार कोतवाल, नरेंद्र दराडे, चिंतामण गावित, दत्ता गायकवाड, सुचेता बच्छाव, परवेझ कोकणी, प्रशांत हिरे, राघोनाना आहिरे, धनजंय पाटील, जिवा पांडू गावित, गणपतबाबा पाटील, देवीदास पिंगळे, माणिकराव कोकाटे, संदीप गुळवे, यशंवत भोये, नानासाहेब पाटील, डॉ. शोभा बच्छाव, वैशाली अनिल कदम, तुकाराम दिघोळे, बबनराव घोलप, प्रसाद हिरे, शोभा दळवी, मंदाकिनी कदम यांचा समावेश आहे.
जिल्हा बॅँकेनेही बजावल्या नोटिसा
दरम्यान, बँकेच्या गुरुवारी झालेल्या मासिक बैठकीत बिगरशेती संस्थाकडील कर्जवसुलीचा आढावा घेण्यात आला. त्यात बिगरशेती संस्थाकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाल्याने त्याच्या वसुलीसाठी तत्कालीन संचालकांच्या स्थावर मालमत्ता शोधून त्यावर बँकेचा बोजा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बँकेचे वरिष्ठ अधिकारी प्राधिकृत करण्यात आलेले आले असून, गुरुवारी निफाड सहकारी साखर कारखाना, नासिक सहकारी साखर कारखाना, श्रीराम सहकारी बँक नाशिक व इतर बिगर शेती सहकारी संस्थाच्या संचालकांवर व संबंधित अधिकाºयांसह सुमारे ५० जणांना कायदेशीर कारवाई करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या संस्थांना कर्ज जिल्हा बॅँकेच्या तत्कालीन संचालकांनी निफाड व नाशिक सहकारी साखर कारखान्याबरोबरच छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग, हिरे कुटुंबीयांच्या रेणुका देवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, श्रीराम सहकारी बॅँक, दिंडोरी तालुक्यातील ५ आदिवासी विकास कार्यकारी सोसायटी, सिन्नर तालुका बहुद्देशीय सहकारी संस्था, मालेगाव मधील १ वि.का. सोसायटीला कर्जवाटप केले होते.