बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे हाजिर हो...
By अझहर शेख | Published: April 16, 2023 02:38 PM2023-04-16T14:38:23+5:302023-04-16T14:38:47+5:30
भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात कोर्टाने बजावले अटक वॉरंट!
अझहर शेख, नाशिक: पंचवटीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्याविरूद्ध २०२३साली भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू असून या खटल्याच्या सुनावणीला चुंभळे हजर राहत नसल्याने न्यायालयाने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांना ‘फर्मान’ काढले आहे.
पंचवटी पोलिस ठाण्यात २०१९साली शिवाजी चुंभळे यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा (रजि.नं.५९०) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.ए.शिंदे यांनी शनिवारी (दि.१५) वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या नावाने जामिनपात्रप पकड वॉरंट बजावले आहे. यामध्ये त्यांनी गुन्ह्याचा उल्लेख करत सदर संशयित आरोपी यास धरून न्यायालयापुढे हजर करावे, असा वॉरंटद्वारे हुकुम केलेला आहे. या वॉरंटमधील लेखी मजकुराप्रमाणे आपण कारवाई करण्यात चुकू नये, असेही स्पष्टपणे म्हटले आहे. यामुळे आता पंचवटी पोलिसांच्या कारवाईकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणूका तीन वर्षानंतर घेतल्या जात आहेत. येत्या २० तारखेला निवडणुकीतून अर्ज माघारी घेतले जाणार असून पॅनलनिर्मिती होणार आहे. चुंभळे विरुद्ध पिंगळे असे गट या निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिवाजी चुंभळे यांना धरून न्यायालयात आणण्याबाबतचे पकड वॉरंट पोलिसांना काढल्याने चुंभळे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
पाच हजाराचे बंधपत्र घेण्याचे आदेश!
दरम्यान, येत्या २६जून २०२३ पर्यंत चुंभळे यांनी न्यायाालयापुढे हजर होण्याविषयी किंवा अन्य रितीने हुकुम येईपर्यंर्त हजर राहतील याविषयी पोलिसांना अनामत ५ हजार रुपयांचे लेखी बंधपत्र दिल्यास त्यांच्याकडून तारण लिहून घ्यावे. तसेच तितक्याच रकमेचा एक जामीनदार दिल्यास चुंभळे यांना सोडून द्यावे, असेही न्यायालयाने वॉरंटच्या शेवटी म्हटले आहे. यामुळे आता पंचवटी पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.