सरकार आपल्या दारी, दुष्काळ उरावरी; शिर्डी येथील शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 08:07 AM2023-09-09T08:07:01+5:302023-09-09T08:07:20+5:30
ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले.
शिर्डी : सरकारची हाताळणी चुकते आहे. थापा मारणारे हे सरकार निर्घृण, निर्दयी व तिडवाकडं आहे. गद्दारी करून आमचे सरकार पाडले असले तरी जनतेला सामोरे जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही. सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी. अशी परिस्थिती सध्या असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत केली. शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजारांप्रमाणे तत्काळ नुकसान भरपाई द्या, वीज बिले माफ करा, अशी सरकारकडे मागणी करत ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या शेतकरी संवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राहाता, कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. यानंतर साईंचे दर्शन घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरवेळी अस्मानी नाही तर राजकारणाची सुलतानी शेतकऱ्यांना रडवतेय. मागील वर्षी अतिवृष्टीने झालेली नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. आता
दुष्काळाचे पंचनामे कधी होतील व भरपाई कधी मिळेल, असा सवाल उपस्थित करतानाच एक रुपयात विमा हे थोतांड असल्याचा व विमा कंपन्यांच्या फायद्याचा व्यवहार सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
मी भारावून गेलो...
आज काकडी येथे एका मुलाने शिदोरी दिली. याबाबत ठाकरे म्हणाले, शिदोरीमुळे मी भारावून गेलो. सत्ताधाऱ्यांना वाटत असेल पक्ष व वडील चोरले; पण जनता आणि आई-वडिलांचा आशीर्वाद आजही सोबत आहे. आपण ही शिदोरी खाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.