माजी शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:25+5:302021-06-28T04:11:25+5:30
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नारायण शंकर तथा नानासाहेब गर्गे (९१, लोकमान्यनगर, गंगापूर ...
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नारायण शंकर तथा नानासाहेब गर्गे (९१, लोकमान्यनगर, गंगापूर रोड) यांचे रविवारी (दि.२७) वृद्धापकाळाने झाले.
द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी नानासाहेब यांची नियुक्ती नाशिक शहर संघचालक म्हणून केली होती. नाशिकमध्ये त्यांनी पंचवीस वर्षे ती जबाबदारी सांभाळताना शहर परीघातील सर्व समाजात आणि सर्व स्तरांमध्ये संघाची पाळेमुळे घट्ट रुजविण्यात योगदान दिले. प्रत्येक स्वयंसेवकासाठी नानासाहेब म्हणजे संघाचे विद्यापीठच होते. नाशिकमध्ये जुनेजाणते करसल्लागार व्यावसायिक म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. त्याशिवाय लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ व दीपक मंडळ यांच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. त्या काळात पंचवटीतील तरुण ऐक्य मंडळाकडून खेळणारे उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणूनही त्यांचा नावलौकीक होता. त्याशिवाय मध्यवर्ती हिंदू सैनिकी संस्थेच्या (भोसला मिल्ट्री स्कूल) व्यवस्थापनात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्यावर रविवारी दुपारी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पुत्र करसल्लागार नितीन व उद्योजक नीलेश, तसेच तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो
२७गर्गे