मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अनिल मटाले यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 02:54 PM2018-01-18T14:54:36+5:302018-01-18T14:55:34+5:30
फेरबदल : प्रदेश सरचिटणीसपदी माजी महापौर अशोक मुर्तडक
नाशिक : महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अनिल मटाले तर प्रदेश सरचिटणीसपदी माजी महापौर अशोक मुर्तडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. मावळते शहराध्यक्ष राहुल ढिकले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती कायम ठेवली आहे.
दोन महिन्यांपूर्वी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शहरात घेतलेल्या पदाधिका-यांच्या मेळाव्यात संघटनात्मक बदलाची घोषणा केली होती. तेव्हापासून कार्यकर्त्यांनाही फेरबदलाचे वेध लागले होते. अखेर, माजी नगरसेवक अनिल मटाले यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून मावळते शहराध्यक्ष राहुल ढिकले यांचेकडे प्रदेश उपाध्यक्षपद कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय, माजी महापौर अशोक मुर्तडक यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल मटाले यांनी महापालिकेत मनसेच्या सत्ताकाळात नगरसेवकपदाबरोबरच गटनेतापद भूषविले होते. एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. राहुल ढिकले यांच्याकडील शहराध्यक्षपदाचा भार काढून घेण्यात आला आहे . राहुल ढिकले हे नाशिक पूर्व विभागातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांच्या भेटीगाठीही सुरू केल्या आहेत. माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडे सध्या कोणतेच पद नव्हते. त्यांना आता प्रदेशवर स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, संघटनेची बांधणी करण्यावर आपला भर राहणार असून कार्यकारिणीत नव्या-जुन्यांचा मिलाफ साधत क्रियाशिल कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे नवनियुक्त अनिल मटाले यांनी सांगितले.
भोसलेंचे पुनर्वसन नाही
मागील विधानसभा निवडणूक पराभव पाहावा लागलेल्या माजी आमदार नितीन भोसले यांना पुन्हा शहराध्यक्षपदाची सूत्रे दिली जातील, असा कयास व्यक्त केला जात होता. मध्यंतरी नितीन भोसले हे राज ठाकरे यांच्या दौ-यात दिसलेही होते. परंतु, भोसले यांना पुन्हा संधी देण्याऐवजी राज यांनी अनिल मटाले या तरुण कार्यकर्त्याच्या हाती शहराच्या नेतृत्वाची धुरा सोपविली आहे. त्यामुळे भोसले यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. भोसले आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक अथवा पश्चिम मतदारासंघातून उमेदवारी करण्याची चर्चा सुरू आहे.