माजी नगरसेवक मुशीर सैय्यद यांनी दफनभूमीच्या जागेत बांधले हॉटेल
By संजय पाठक | Published: July 4, 2024 06:39 PM2024-07-04T18:39:47+5:302024-07-04T18:40:11+5:30
आमदार नितेश राणे यांचा विधानसभेत आरोप: उद्योग मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
नाशिक : सध्या उद्धव सेनेत असलेले नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मुशीर सैय्यद यांनी जुन्या नाशकातील दफनभूमीच्या जागेची फोड करून त्यावर भले मोठे हॉटेल उभारले आहे, हे हॉटेल तत्काळ तोडावे अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. राणे यांनी विधानसभेत आरोप केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे अश्वासन दिले आहे.
अनेक पक्षात असलेले आणि सध्या उद्धव सेनेत दाखल असलेल्या माजी नगरसेवक मुशीर सैय्यद यांचे सारडा सर्कल येथे हॉटेल असून ते दफनभूमीच्या जागेत असल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला. मुस्लीम समाजाच्या दृष्टीने दफनभूमीची जागा महत्त्वाची मानली जाते. महापालिकेने ही जागा राखीव ठेवल्यानंतर त्या जागेत आता मुशीर सय्यद यांचे हॉटेल उभारण्यात आले आहे. त्यासाठी जागेचे विभाजन दाखवण्यात आले आहे. अशाप्रकारचे जागेचे विभाजन करण्याचे अधिकार केवळ आयुक्तांना असताना ते महापालिकेच्या एका कार्यकारी अभियंत्याने केले आहेत. त्यामुळे हे वादग्रस्त हॉटेल पाडावे आणि संबंधित अभियंत्यावर देखील तत्काळ कारवाई करावी अशी मागणी आमदार राणे यांनी केली.
मुशीर सय्यद यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, तसेच त्यांनी यापूर्वी नाशिक महापालिकेत वंदेमातरम म्हणण्यास नकार दिला होता, असा आरोप करीत राणे यांनी मुशीर सय्यद यांच्या हॉटेलचे फोटोदेखील सभागृहात दाखवले.