माजी जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या पत्नी आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:01 PM2021-03-02T23:01:47+5:302021-03-03T00:44:14+5:30
उमराणे : येत्या १२ मार्च रोजी होऊ घातलेल्या बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ग्यानदेवदादा देवरे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देवरे व माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांच्या पत्नी कमल देवरे हे वॉर्ड क्र. ६ मधून एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.
उमराणे : येत्या १२ मार्च रोजी होऊ घातलेल्या बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ग्यानदेवदादा देवरे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देवरे व माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांच्या पत्नी कमल देवरे हे वॉर्ड क्र. ६ मधून एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. उमराणे येथील कुठल्याही निवडणुकीत जि.प.चे माजी अध्यक्ष ग्यानदेव देवरे व माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांचे गट आमने-सामने उभे ठाकतात. त्यामुळे येथे होत असलेल्या प्रत्येक निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असते. दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी सरपंचपदासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा लिलाव व रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार या मुद्द्यांवरून एका रात्रीत संपूर्ण राज्यात प्रकाशझोतात आलेली उमराणे ग्रामपंचायत निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे नव्याने होत असलेली निवडणूक ही अत्यंत अटीतटीची व चुरशीची होणार हे स्पष्ट झाले होते. त्याच अनुषंगाने १२ मार्च रोजी होत असलेल्या १७ जागांकरिता कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे व रामेश्वर ग्रामविकास पॅनल आमने-सामने आले आहेत. ग्यानदेवदादा देवरे पॅनलकडून माजी जि. प. अध्यक्ष ग्यानदेव देवरे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देवरे व रामेश्वर ग्रामविकास पॅनलकडून जि. प. उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांंच्या पत्नी कमल देवरे या दोघ्याही वॉर्ड क्र. ६ मधून एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.
त्याचबरोबर रामेश्वर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व करणारे जि. प. सदस्य प्रशांंत देवरे हे वॉर्ड क्र. ३ मधून तर ग्यानदेवदादा देवरे पॅनलचे नेतृत्व करणारे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे हे वॉर्ड क्र. ५ मधून निवडणूक लढवित आहेत.
प्रतिष्ठेच्या लढती
शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भरत देवरे, वसाकाचे माजी उपाध्यक्ष कै. रामदास देवरे यांचे चिरंजीव सचिन देवरे, मालेगाव शेतकी संघाचे अध्यक्ष संंदीप देवरे यांच्या पत्नी छाया देवरे, बाजार समितीचे प्रशासकीय संचालक संजय देवरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष देवरे यांच्या पत्नी मंगला देवरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आपापले पॅनल निवडून येण्यासाठी दोन्ही पॅनलकडून व उमेदवारांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रचार सभा, रॅली यावर निर्बंध असल्याने प्रचारासाठी बॅनर्स व सोशल मीडियाचा वापर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.