माजी जिल्हाप्रमुखांची सेनेच्या गटबाजीत उडी

By admin | Published: July 1, 2017 12:16 AM2017-07-01T00:16:05+5:302017-07-01T00:16:30+5:30

नाशिक : नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून आलेल्या सेनेंतर्गत गटबाजीत दत्ता गायकवाड यांनी उडी घेत विजय करंजकर यांचे नाव न घेता शरसंधान केले आहे.

The former District President jumped into the grouping of the army | माजी जिल्हाप्रमुखांची सेनेच्या गटबाजीत उडी

माजी जिल्हाप्रमुखांची सेनेच्या गटबाजीत उडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून आलेल्या सेनेंतर्गत गटबाजीत माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी उडी घेत जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे नाव न घेता शरसंधान केले आहे. मुलगा कितीही मोठा झाला तर बाप हा बापच असतो हे लक्षात ठेवा, असा इशारा देत गायकवाड यांनी नाशिक महापालिका, कॅन्टोंमेंट बोर्ड व विविध नगर परिषदेच्या निवडणुकीत कोणी कोणी काय केले, याची सारी माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून देणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. दत्ता गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने व्यापारी बॅँक काबीज केल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा फलक शिवसेना भवनावर लावण्यात आल्यानंतर उघड झालेल्या सेनेंतर्गत गटबाजीची सर्वत्र चर्चा झाली. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदींनी तो वादग्रस्त फलक काढून टाकल्याने या वादावर पडला असे मानले जात असताना गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे कुठेही नाव न घेता त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. पत्रकात म्हटले आहे की, बॅँकेत दहा वर्षे योग्य काम केल्यामुळे सभासदांनी सहकार पॅनलच्या ताब्यात सत्ता दिली. परंतु या निवडणुकीत काहींनी पक्षीय राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. सहकारात सर्वच पक्षांच्या लोकांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्या महानगरप्रमुख व जिल्हा प्रमुखपदाच्या कारकिर्दीत जनलक्ष्मी, नामको या बॅँकांमध्ये शिवसैनिकांना प्रवेश मिळवून दिला. परंतु व्यापारी बॅँकेच्या निवडणुकीत सोशल मीडियाद्वारे करण्यात आलेल्या प्रचारात एक भाषण आपण ऐकले व त्यात ‘तुमचा बाप बॅँकेत येतो’ असे वक्तव्य करण्यात आल्याचे ऐकले; मात्र ज्यांनी हे वक्तव्य केले त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मुलाची उंची बापापेक्षा वाढली तरीही मुलगा हा मुलगाच असतो आणि बाप हा बापच असतो हे ध्यानात ठेवावे, असा इशारा गायकवाड यांनी करंजकर यांना दिला आहे.
निष्ठावान कोण हे शिवसैनिक ठरवतील
निवडणुकीच्या प्रचारात विजय करंजकर यांनी आपल्या पॅनलमध्ये अकरा शिवसैनिक असल्याचे म्हटले होते, त्याचा समाचार घेताना गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे की, निष्ठेची व्याख्या काय हे संबंधितांना माहिती आहे किंवा नाही याचीच शंका वाटते. ज्यांची नावे शिवसैनिक म्हणून घेतली गेली त्यांची नावे जाहीर करावीत व ते निष्ठावान आहेत किंवा नाही याचा निर्णय शिवसैनिकांना घेऊ द्या. आमच्या पॅनलमध्ये मी स्वत: जगन आगळे, डॉ. दत्तात्रय पेखळे, सुधाकर जाधव, श्रीराम गायकवाड, अरुण जाधव, अशोक सातभाई व रंजना बोराडे हे आठ शिवसैनिक आहेत, असा दावा करून गायकवाड यांनी, सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्यांनी आपण किती पक्ष बदलले याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही दिला आहे.

Web Title: The former District President jumped into the grouping of the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.