माजी मंत्री बबनराव घोलप शिंदे गटाच्या वाटेवर? ठाकरे गट सोडण्याच्या तयारीत
By संजय पाठक | Published: February 14, 2024 04:16 PM2024-02-14T16:16:20+5:302024-02-14T16:22:16+5:30
दोन दिवसांत निर्णय घेणार.
संजय पाठक, नाशिक : ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्तआहे. अद्याप घोलप यांनी तसा निर्णय घेतला नसला तरी दोन दिवसांत ठाकरेगटाबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचेसंपर्क मंत्रिपद काढून घेतल्यापासून ते ठाकरे गटात नाराज असून, त्यांनीआपल्या उपनेते पदाचा राजीनामादेखील दिला होता. मात्र, तो नाकारण्यात आला.
त्यानंतर खासदार संजय राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घोलप यांनी आपली बाजू मांडली होती. तसेच चर्मकार संघटनेच्या वतीने मुंबईत निदर्शने करण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर घोलप यांची कोणतीही दखल ठाकरे गट घेत नसून गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनालादेखील ते उपस्थित नव्हते. गेल्या आठवड्यात चर्मकार समाज संघटनेच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात एक बैठक घेण्यात आली. शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी अशा विविध समाजाच्या संघटनांच्या बैठका त्या दिवशी आयाेजित केल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्मकार समाजाच्या ९० टक्के मागण्या मान्य केल्या असल्याचे माजी मंत्री घोलप यांचे म्हणणे आहे.