माजी मंत्री बबनराव घोलप यांचा उपनेते पदाचा राजीनामा; शिर्डी मतदार संघावरून वाद
By संजय पाठक | Published: September 10, 2023 04:40 PM2023-09-10T16:40:40+5:302023-09-10T16:40:47+5:30
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेच्या संपर्कप्रमुख आणि उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
नाशिक - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेच्या संपर्कप्रमुख आणि उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. देवळाली मतदारसंघातून तब्बल पंचवीस वर्षे आमदार असलेल्या घोलप यांचे चिरंजीव देखील गेल्या पंचवार्षिक मध्ये आमदार होते शिवसेनेत फूट पडल्यानंतरही घोलप हे ठाकरे गटाची निष्ठावान होते. दरम्यान बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात देण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी कबूल केले होते. मात्र, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षाने प्रवेश दिल्यामुळे घोलप यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी वाकचौरे यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिलेला नाही असे सांगण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वी शिर्डीचे संपर्कप्रमुख पद घोलप यांच्याकडून काढून घेऊन त्यांच्याऐवजी ऍड. विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे घोलप यांना यापदारून दूर केल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे नाराज घोलप यांनी उपनेता पदाचाही राजीनामा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. गेली 25 वर्षे आपण पक्षाचे काम निष्ठावान म्हणून केले मात्र मिलिंद नार्वेकर यांनी हस्तक्षेप सुरू केला उद्धव ठाकरे यांच्या अहमदनगर येथील दौऱ्यात मिलिंद नार्वेकर सतत वाकचौरे यांना पुढे पुढे करत होते अशा प्रकारचे लांगुलचालन आपल्याला जमणार नाही असे यासंदर्भात घोलप यांनी लोकमतला सांगितले.