माजी मंत्री ए. टी. पवार यांचे मुंंबईत निधन
By Admin | Published: May 11, 2017 02:42 AM2017-05-11T02:42:02+5:302017-05-11T02:47:06+5:30
कळवण : माजी आदिवासी विकासमंत्री व आठ वेळा कळवण मतदारसंघाची आमदारकी भूषविलेले अर्जुन तुळशीराम तथा ए. टी. पवार (७९) यांचे बुधवारी सकाळी बॉम्बे हॉस्पिटल येथे अल्प आजाराने निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : माजी आदिवासी विकासमंत्री व आठ वेळा कळवण मतदारसंघाची आमदारकी भूषविलेले तसेच पाणीदार नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेले अर्जुन तुळशीराम तथा ए. टी. पवार (७९) यांचे बुधवारी सकाळी साडेसात वाजता बॉम्बे हॉस्पिटल येथे अल्प आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. गुरुवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता दळवट या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आदिवासी भागात विकासाभिमुख कार्य करणारे पाणीदार नेतृत्व म्हणून पवार यांची महाराष्ट्रभर ओळख होती. कळवण या आदिवासी विधानसभा मतदारसंघाचे आठ वेळा प्रतिनिधित्व करताना त्यांनी आदिवासी विकास, समाजकल्याण, बांधकाम, वन व पशुसंवर्धन, रोजगार व स्वयंरोजगार या खात्यांची राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही पार पाडली. त्यांनी पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण अशी अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली. आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करण्यातही त्यांचा सहभाग होता. त्या माध्यमातून त्यांनी सुमारे ३०० आश्रमशाळांना मंजुरी दिली होती. चणकापूर धरण, अर्जुनसागर (पुनंद), धनोली प्रकल्प, भेगू, ओतूर, बोरदैवत, चिंचपाडा, गोबापूर, मार्कंडपिंप्री, मळगाव, नांदुरी या लघुपाटबंधारे योजनांसह २३ छोटी-मोठी धरणे, पाझर तलाव, कोल्हापूर बंधारा या सिंचन योजना मार्गी लावल्यामुळे सिंचनात वाढ झाली आहे. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी अनेक शासकीय कार्यालये कळवणमध्ये कार्यान्वित करून दिली. नाशिक जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी पक्षबांधणीसाठी मोठे योगदान दिले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तसेच तापी विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने नाशिक येथील डॉ. गुप्ते यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गेल्या आठवड्यापासून त्यांना अधिक उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, प्रवीण पवार या दोन मुलांसह मुली डॉ. विजया भुसावरे व गीता गोळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, सदस्य डॉ. भारती पवार या स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.
मान्यवरांकडून अंत्यदर्शन दुपारी साडेचार वाजता पवार यांचे पार्थिव नाशिक येथील गंगापूररोडवरील ‘अर्जुन सागर’ निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. महापौर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जयंत जाधव, डॉ. राहुल अहेर, माजी खासदार प्रताप वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.