माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 07:44 PM2019-11-30T19:44:33+5:302019-11-30T19:53:26+5:30
राज्याचे माजी मंत्री तथा क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे यांचे शनिवारी (दि.३०) पहाटे नाशिकमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. डोंगरे वसतिगृह मैदानावर दुपारी सव्वाचार वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवास पुत्र अभिजित दिघोळे यांनी मुखाग्नी दिला.
नाशिक : राज्याचे माजी मंत्री तथा क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे यांचे शनिवारी (दि.३०) पहाटे नाशिकमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. डोंगरे वसतिगृह मैदानावर दुपारी सव्वाचार वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवास पुत्र अभिजित दिघोळे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी माजी मंत्री विनायकदादा पाटील, डॉ. शोभा बच्छाव, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांंनी उपस्थित राहून दिघोळे यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच नाशिक जिल्ह्यातील संयमी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली.
नाशिकमधील कॉलेजरोड परिसरातील अक्षय बंगलो येथील निवासस्थानी त्यांचे पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती कळताच आप्तेष्ट परिवार, कार्यकर्ते व पदाधिक ाºयांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांचे पार्थिव क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी नाशिक जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलीस पथकाने हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. डोंगरे वसतिगृह मैदानावर जमलेला समाज शोकसागरात बुडाल्याचे पाहायला मिळाला. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, पंकज भुजबळ, जयप्रकाश छाजेड, जयंत जाधव, अशोक धात्रक, गजानन धात्रक, माजी महापौर अशोक मुर्तडक, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, सहचिटणीस डॉ. सुनील ढिकले, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, अॅड. दाजिबा सांगळे, अॅड. भगीरथ शिंदे, निवृत्ती डावरे, गं. पा. माने, श्रीधर देशपांडे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, पंडितराव पिंगळे, संदीप गुळवे आदी उपस्थित होते.
दुष्काळी तालुक्याची औद्योगिक नगरी केली
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे काम करताना नाशिक जिल्ह्यात केलेली पाझर तलावाची कामे आणि दुष्काळी तालुका म्हणून परिचित असललेल्या सिन्नर तालुक्याला एमआयडीसीच्या माध्यमातून औद्योगिकनगरी अशी ओळख मिळवून दिल्याच्या भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. राजकारणासोबतच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात तुकाराम दिघोळे यांनी अतुलनीय योगदान दिले असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी क धीही भरून निघणारी नसल्याची प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.