उध्दव सेनेचे माजी आमदार- भाजपाच्या आमदारांत जुंपली
By संजय पाठक | Published: June 30, 2024 06:20 PM2024-06-30T18:20:16+5:302024-06-30T18:20:36+5:30
संपर्क कार्यालय उध्वस्त केल्याने आरोप प्रत्यारोप
नाशिक- उध्दव सेनेचे माजी आमदार वसंत गीते यांचे मुंबई नाका येथील संपर्क कार्यालय काल महापालिकेने जमीनदोस्त केले. मात्र, त्या मागे
भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा दबाव होता, असा आरोप गिते यांनी केला असून त्याला उत्तर देताना फरांदे यांनी हात झटकले असले तरी या कार्यालयात जुगार आणि दारू अड्डा चालत होता, त्यामुळे महापालिकेने दडपशाहीला झुगारून केलेली कारवाई योग्यच असल्याचा दावा फरांदे यांनी केला आहे.
भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे आणि उध्दव सेनेचे माजी आमदार वसंत गीते यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. लाेकसभा निवडणुकीच्या वेळी जुने नाशिक
भागात या दोघांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान काल महापालिकेच्या पथकाने गिते यांचे मुंबई नाका येथील संपर्क
कार्यालय हटवण्याची कार्यावाही सुरू केल्यानंतर तीन तास हाय होल्टेज ड्रामा झाला हेाता. त्यानंतर हे कार्यालय महापालिकेने पाडले त्यावरून आता
वाद पेटला आहे. आमदार फरांदे यांनी राजकीय व्देषापोटी हे कार्यालय पाडल्याचा आरोप गीते यांनी केला आहे.
तर ज्या कार्यालयात बेकायदेशीर दारू आणि जुगार अड्डा चालत होता, ते तेाडण्याचे काम महापालिकेने केले ते योग्यच असल्याचा दावा फरांदे यांनी केला आहे नाशिक मध्य विधान सभा मतदार संघात हे दोघे आमने सामने येण्याची शक्यता असून त्यापूर्वीच दोघांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.