माजी आमदार संजय पवार यांचा भाजपला ‘ जय श्रीराम ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:28 AM2021-12-17T01:28:02+5:302021-12-17T01:28:43+5:30
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांनी भाजपला ‘ जय श्रीराम ’ म्हणत पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली आहे. येवला येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पवार यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.
येवला : नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांनी भाजपला ‘ जय श्रीराम ’ म्हणत पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली आहे. येवला येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पवार यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.
पवार यांच्यासोबत मालेगाव येथील भाजपचे पदाधिकारी अनिल वाघ, संजय वाघ तसेच अशोक पवार, बाळासाहेब चव्हाण, विठ्ठल आहेर, हिरामण वडगर, सुधाकर पवार, मच्छिंद्र सातपुते या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्षात काम करत असताना मतभेद असतील ते चर्चेतून सोडविले जात असतात. अगदी टोकाचे निर्णय घेऊ नये. पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन भुजबळ यांनी यावेळी दिले. यावेळी माजी आमदार संजय पवार यांनी गेल्या अडीच वर्षांपूर्वी माजी आमदार पंकज भुजबळ यांना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता. आज अधिकृत प्रवेश पक्षात करत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार पंकज भुजबळ,जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, नांदगावचे शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुण थोरात, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, राजेंद्र नहार, सोपान पवार, दत्तू पवार आदी उपस्थित होते.
इन्फो
पवारांचा पक्षांतराचा प्रवास
नागापूर सारख्या ग्रामीण भागातून आलेले संजय पवार सन २००४ ते २००९ या काळात शिवसेनेचे आमदार होते. त्यापुढील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी पंकज भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा ऐनवेळी रद्द झाल्याने त्यावेळी चर्चेला मोठे उधाण आले होते. त्यातूनच पुढे पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा ते स्वगृही परतले होते. पुढे २०१६ मध्ये त्यांनी शिर्डी येथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे.