माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 10:02 PM2019-11-03T22:02:33+5:302019-11-03T22:03:27+5:30
सिन्नर : तालुक्यातील माजी आमदार आणि माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष सूर्यभान सुखदेव गडाख (९२) यांचे दीर्घ आजाराने रविवारी रात्री साडे आठ वाजता निधन झाले. काही वर्षांपासून गडाख आजारी होते. नाशिक येथील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी देवपूर येथे सोमवारी सकाळी ९ वाजता होणार आहे.
सिन्नर येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात गडाख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली होती. १९७८ साली अपक्ष म्हणून तर १९८० साली समाजवादी काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवत त्यांनी दोनदा आमदारकी भूषविली होती. अल्प शिक्षण असताना गडाख यांनी सिन्नरला औद्योगिक वसाहत स्थापन करून अनेक कारखाने सिन्नरला आणले. गडाख यांच्या काळात रोजगार हमी योजनेतून अनेक बंधारे व रस्त्यांची कामे झाली. औद्योगिक वसाहतीत तालुक्यातील तरु णांना रोजगार मिळाला, त्यामुळे दुष्काळात हजारो बेरोजगारांना मोठा आधार मिळाला होता. गडाख यांनी माळरानावर माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना करून शिक्षणाची गंगोत्री तालुक्यात आणली. तालुक्याच्या विकासात गडाख यांची साडेसात वर्षांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली. त्यांच्या पश्चात पत्नी सुनिता, मुलगा अण्णासाहेब, विजय, राजेश आणि चार मुली व नातवंडे असा परिवार आहे.