माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:34 AM2018-08-18T01:34:34+5:302018-08-18T01:35:07+5:30

शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पंचवटीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

 Former MP Rajabhau Godse passes away | माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

Next

नाशिक : शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पंचवटीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.  गेल्या पंधरा दिवसांपासून ते पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अनेक शिवसैनिक भेटीदेखील घेत होते. शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शेकडो शिवसैनिकांनी रुग्णालयात धाव घेतली. शनिवारी (दि. १८) सकाळी संसरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. गोडसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातंवडे असा परिवार आहे.
सायंकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लामरोडवरील देवळाली हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह अन्य अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.  मध्यंतरी काही काळासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेत गेलेले राजाभाऊ गोडसे हे कट्टर शिवसैनिक असल्याने पुन्हा स्वगृही परतले. शिवसेनाचा आक्रमक आणि ग्रामीण बाज असलेला चेहेरा ही त्यांची ओळख होती. संसरी गावात पहिलवान म्हणून त्यांनी ओळख होती. त्यांचे चुलते अंबादास गोडसे हे कट्टर शिवसैनिक होते. त्यामुळे त्यांना राजकारणाचे शिवसेनेचे बाळकडू मिळाले. शिवसेनेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर देवळाली कॅम्प सेनेपासून त्यांनी कार्यास प्रारंभ केला. सुरूवातीला देवळाली कॅम्पचे शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर संसरी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ते निवडून आले. शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात शिवसेना शाखा सुरू करण्याचा धडका त्यांनी लावला. त्यांचे संघटन कौशल्य बघून शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्याकाळात संघटनेवर त्यांची पकड मजबुत झाली आणि तब्बल १२ वर्षे शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची कारकिर्द त्यांनी गाजवली. एकलहरा गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले होते.  शिवसेनेचे ते जिल्हा प्रमुख असतानाच त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये शिवसेनेचे चौथे महाअधिवेशन १९९४ मध्ये झाले आणि ते सत्तेकडे नेणारे ठरले. दार उघड बये दार उघड असे साकडे त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी घातले आणि त्यानंतरच १९९४-९५ मध्ये राज्यात शिवसेना भाजपा युतीची सत्ता आली. त्यांच्या यशस्वी संयोजनामुळेच त्यांना १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली आणि नाशिक मतदार संघात (कै.) डॉ. वसंत पवार यांच्यासारख्या उमेदवाराला पराभूत करून गोडसे निवडून आले होते. संसरीसारख्या छोट्या गावातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाल्याने त्यांचा तळागाळातल्या जनतेशी संबंध होता. खासदार असताना त्यांनी लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या मांडल्या. अवघ्या अडीच वर्षांची कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या काळात शिवसेनेने सहकार क्षेत्रासह अनेक ठिकाणी सत्ता आणली. त्यामुळे त्यांची कारकिर्दीत शिवसेनेचे यशाचे शिखर गाठले होते.
संसरी ते संसद हे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर पुस्तकही लिहिले. खासदार असताना त्यांना संसदेच्या संरक्षण समितीवर कामदेखील केले होते. शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर विशेष स्नेह होता. मॉसाहेब मीनताई ठाकरे यांनी तर त्यांना मानसपुत्र मानले होते.

Web Title:  Former MP Rajabhau Godse passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू