माजी ऑलिम्पियन दत्तू भोकनळ याचा लष्करी सेवेतून राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:20+5:302021-07-14T04:18:20+5:30
नाशिक : रिओ ऑलिम्पिकमध्ये रोइंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेला चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहीचा रहिवासी दत्तू भोकनळ या ...
नाशिक : रिओ ऑलिम्पिकमध्ये रोइंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेला चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहीचा रहिवासी दत्तू भोकनळ या रोइंगपटूने रोइंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत राजकारणाचा बळी ठरविण्यात आल्यानेच आपल्याला ऑलिम्पिक पात्रतेसाठीदेखील पाठविण्यात आले नसल्याचा आरोप केला. तसेच या राजकारणापायीच फेडरेशनने बेशिस्तीचा ठपका ठेवल्याने त्याविरोधात लढताना लष्करात राहून आरोप, प्रत्यारोप शक्य नसल्याने लष्करी सेवेचा राजीनामा दिल्याचे भोकनळ याने सांगितले.
जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोट्या गावात अत्यंत सामान्य कुटुंबातील युवक असलेला दत्तू भोकनळ याने उदरनिर्वाहासाठी अवघ्या १९ व्या वर्षी लष्करात भरती झाला होता. त्यानंतर अवघ्या चार वर्षांत २०१४ मध्ये राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत दोन सुवर्णपदके, आशियाई स्पर्धेत रौप्यपदक, तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या सर्वोच्च स्पर्धेत तो तेरावा आला होता. मात्र, खेळाला सुरुवात केल्यापासून अवघ्या ६ वर्षांत ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचण्याची त्याची कामगिरीच सर्वांना अचंबित करून जाणारी होती. दरम्यान, गत चार वर्षांच्या काळात काही कौटुंबिक वादविवादांमध्येदेखील तो अडकला होता. त्यानंतर सारे काही सुरळीतपणे सुरू झालेले होते. मात्र, सप्टेंबर २०२० मध्ये तो रोइंग फेडरेशनच्या शिबिरात टाेक्यो ऑलिम्पिकच्या सरावासाठी दाखल झालेला होता. मात्र, २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात त्याला बेशिस्तीसह अनफिट असल्याचे सांगत कॅम्पमधून बाहेर काढण्यात आले. त्याबाबत दत्तूने रोइंग फेडरेशनकडे विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून त्याला कोणतेच उत्तर मिळाले नाही. लष्कराच्या वतीनेदेखील नोव्हेंबरपासून पत्रव्यवहार करून विचारणा करण्यात आल्यानंतरही त्याबाबत कोणतेच लेखी उत्तर देण्यात आले नसल्याचे दत्तूने सांगितले.
इन्फो
अर्जुन पुरस्कारप्राप्त पहिला रोइंगपटू
साडेसहा फूट उंचीच्या दत्तू याच्या खांद्यातील ताकद ओळखून लष्करी अधिकारी आणि रोइंग प्रशिक्षक कुदरत अली यांनी त्याची रोइंग या खेळासाठी निवड केली होती. त्यानंतर त्याने अल्पावधीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय यश मिळवत सिंगल स्कल प्रकारात २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली होती. त्यामुळेच २०२० साली दत्तूला केंद्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारा दत्तु हा पहिला रोइंगपटू ठरला होता.
कोट
सिंगल स्कल प्रकारातील २ किलोमीटर अंतरासाठी माझे सध्याचे टायमिंग ६ मिनिटे ५५ सेकंद इतके होते. तर ऑलिम्पिकला पात्रता वेळ ६ मिनिटे ५७ सेकंद इतके होते. तरीदेखील मला हेतुपुरस्सर बाजूला सारून ज्यांचे टायमिंग ७ मिनिटांपेक्षा अधिक होते, त्यांना भारताकडून ऑलिम्पिक पात्रतेसाठी पाठविण्यात आले. त्यामुळेच सिंगल स्कल रोईंगला गेलेला एकही रोईंगपटूदेखील ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकला नाही. मात्र लष्करी शिस्तीत राहून फेडरेशनला जाबजबाब करणे शक्य नसल्यानेच लष्करातून राजीनामा देऊन बाहेर पडलो असून मी या अन्यायाविरुद्ध लढणार आहे.
दत्तू भोकनळ, माजी ऑलिम्पियन रोइंगपटू
फोटो
१२दत्तू भोकनळ