विवाहिता प्राध्यापकाला कुंकू लावून माजी विद्यार्थ्याने केला विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 06:42 PM2019-01-22T18:42:38+5:302019-01-22T18:45:58+5:30
पिडित विवाहिता प्राध्यापक नेहमीप्रमाणे गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात नोकरीसाठी हजर झाल्या होत्या.
नाशिक : शहरातील एका महाविद्यालयातील प्रयोगशाळेत धक्कादायक असा प्रकार घडला. या महाविद्यालयातून एम.एस्स.सी ची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याने चक्क विवाहिता प्राध्यापकाच्या कपाळावर बळजबरीने कुंकू लावत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडित विवाहिता प्राध्यापक नेहमीप्रमाणे गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात नोकरीसाठी हजर झाल्या होत्या. ते नियमितपणे प्रयोगशाळेत कर्तव्य बजावत असताना सोमवारी (दि.२१) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयित योगेश रमेश जावळे (२९, रा.चव्हाणके टॉवर मखमलाबादनाका) याने पिडित विवाहितेसोबत फोनवर संपर्क साधत व प्रत्यक्ष भेटून लग्नाची मागणी घातली. विवाहितेने नकार दिल्याचा राग येऊन जावळे याने थेट प्रयोगाशाळेत विवाहितेचा हात धरला ‘तु माझ्यासोबत लग्न कर’ असे सांगून खिशातून कुंकुवाची पुड काढत कपाळावर कुंकू भरण्याचा प्रयत्न केला; मात्र विवाहितेने त्याचा हाताला जोरदार हिसका दिल्याने कुंकुवाची पूड जमिनीवर पसरली. यावेळी झालेल्या आरडाओरडचा व साहित्य पडण्याचा आवाज ऐकूण फिर्यादी पिडितेला सोडविण्यासाठी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान, संशयित जावळे याने कर्मचा-यांना धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केल्याचे पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलिसांनी संशयित जावळेविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी (दि.२२) संध्याकाळी त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, या घटनेनंतर महाविद्यालयाच्या परिसरात एकच चर्चा सुरू झाली होती. घडलेला प्रकार अत्यंत निंदणीय असा असून संतप्त भावना शिक्षकवर्गातून उमटल्या. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली. याप्रकरणी अधिक तपास योगिता नारखेडे करीत आहेत.